सीएएविरोधात आंदोलनादरम्यान अज्ञाताकडून गोळीबार; एक जखमी
सीएएविरोधात आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतल्या जामिया नगरमध्ये (Jamia Nagar) सीएएविरोधात (CAA) शांततेत आंदोलन सुरू असताना अचानक एका अज्ञाताने गोळीबार (Firing) केल्यामुळे आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. या गोळीबारात एक जण जखमी झालाय. आंदोलन सुरू असताना एक अज्ञात अचानक आला आणि त्यानं पिस्तूल काढून आंदोलकांच्या दिशेनं फायरिंग केली. यात शादाब नावाचा तरुण जखमी झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणारा व्यक्ती पोलीस आणि माध्यमांना धमकवण्याचा प्रयत्न करत होता. मी सर्वांना आझादी देईल असंही तो बोलत असल्याचं समजतं आहे. याचवेळी त्या व्यक्तीकडून गोळीबार झााल. यात एका विद्यार्थ्याला गोळी लागली. हा विद्यार्थी जामिया विद्यापिठातील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गोळीबार करणाऱ्या अज्ञाताला ताब्यात घेण्यात आलं आहे. तर दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) या प्रकरणी ते अधिक चौकशी करत असल्याचं सांगितलंय.
दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना हा मोर्चा काढण्यासाठी परवानगी दिली नसतानाही, विद्यार्थ्यांकडून मोर्चा काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे.