देशात म्युकरमायकोसिसचं पहिल्यांदाच नवं प्रकरण आलं समोर, डॉक्टरही हैराण
काळ्या बुरशीचा हा आजार जीवघेणा बनला आहे. आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे अनेक रुग्ण आढळले आहेत.
मुंबई : कोरोनानंतर आता देशात सर्वात जास्त चिंता वाढवली आहे ती म्हणजे काळी बुरशी (म्युकरमायकोसिस) च्या आजाराने. काळ्या बुरशीचा हा आजार जीवघेणा बनला आहे. या आजाराबद्दल लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, गुजरातमधील सूरतमध्ये काळ्या बुरशीचे एक नवीन प्रकरण समोर आले आहे. ज्यामध्ये काळ्या बुरशीने (Black fungus) रुग्णाच्या थेट मेंदूत प्रवेश केला. काळ्या बुरशीशी संबंधित असलेल्या देशातले हे पहिलेच प्रकरण आहे. (New Case Of Mucormycosis)
मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमधील एका 23 वर्षीय तरूणाच्या डोक्यात काळ्या बुरशीचे संक्रमण दिसून आले. डॉक्टरांचे म्हणणे आहे की हे संक्रमण रूग्णाच्या मेंदूत आढळून आले. या आजाराचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाची शस्त्रक्रिया केली पण तो वाचू शकला नाही. शस्त्रक्रियेनंतर चौथ्या दिवशी रुग्णाचा मृत्यू झाला.
डॉक्टरही आश्चर्यचकीत
ब्लॅक फंगसच्या या प्रकरणाने डॉक्टरांनाही आश्चर्यचकीत केले आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बुरशीचा परिणाम 23 वर्षांच्या तरूणामध्ये सायनसऐवजी थेट मेंदूत आला होता. डॉक्टरांनी असा दावाही केला आहे की, देशातील ही पहिलीच घटना आहे ज्यामध्ये रुग्णाच्या मेंदूत काळ्या बुरशीचे प्रमाण दिसून आले.
14 वर्षांच्या मुलामध्ये काळ्या बुरशीचे प्रथम प्रकरण
यापूर्वी गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका 14 वर्षाच्या मुलामध्ये काळ्या बुरशीचा संसर्ग दिसून आला होता. कोरोना पॉझिटिव्ह मुलाचा म्युकरमायकोसिस रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर शुक्रवारी अहमदाबादच्या रूग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन दरम्यान मुलाच्या उजव्या बाजूला असलेले दात काढावे लागले. मुलांमध्ये काळ्या बुरशीचे हे पहिले प्रकरण आहे. डॉक्टरांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.
आतापर्यंत देशाच्या विविध भागात काळ्या बुरशीचे 7,251 रुग्ण आढळले आहेत, ज्यात 219 लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशात काळ्या बुरशीच्या वाढत्या रुग्णांमुळे त्याशी संबंधित औषधांची कमतरता आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने या आजारावर उपाय म्हणून बरीच मोठी पावले उचलली.
केंद्र सरकारने देशात वाढत्या काळ्या बुरशीच्या रुग्णांचं प्रमाण पाहता औषधे तयार करण्यासाठी आणखी नवीन कंपन्यांना परवाने दिले. आत्तापर्यंत पाच कंपन्या देशात Amphotericin B लस तयार करीत आहेत. यामध्ये भारत सीरम आणि व्हॅकीन्स लिमिटेड, बीडीआर फार्मास्युटिकल्स, सन फार्मा, सिप्ला, लाइफ केअर इनोव्हेशनचा समावेश होता. त्याचबरोबर मायलन लॅबमधून त्याची औषधे आयात केली जात होती.