मुंबई : मुळच्या उल्हासनगर येथील असणाऱ्या आणि देशातील पहिल्या नेत्रहीन महिला आयएएस अधिकारी असणाऱ्या प्रांजल पाटील यांनी सोमवारी एक नवी जबाबदारी स्वीकारली. उप जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी केरळमधील तिरुवअनंतपूरम येथे त्यांचा कामाची सूत्र हाती घेतली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतिशय आनंदाच्या आणि प्रचंड अभिमानाच्या अशा या दिवशी पाटील यांच्या स्वागतासाठी पोलीस महाअधिक्षक आणि शासकीय सेवेतील काही बड्या अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती. या क्षणाचे अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. ज्यानंतर अनेकांनीच प्रांजल पाटील यांचं कौतुक केलं. 


कमकुवत दृष्टीसह जन्मलेल्या पाटील यांनी वयाच्या सहाव्याच वर्षी त्यांची पूर्ण दृष्टी गमावली. पण, यामुळे त्यांच्या स्वप्नाळू दृष्टीवर मात्र काही परिणाम झाला नाही. आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्नच त्यांनी उराशी बाळगलं होतं. याच जिद्दीच्या बळावर त्यांनी पहिल्याच प्रयत्नांत लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केलं होतं. ज्यानंतर भारतीय रेल्वे सेवेच्या लेखा आयोगामध्ये त्यांना नोकरीची संधी होती. पण, नेत्रहिन असल्या कारणामुळे त्यांना ही नोतरी नाकारण्यात आली होती. 



काही कठीण प्रसंगांचा सामना करत पाटील यांनी त्यांचा अभ्यास सुरुच ठेवला. ज्यामंतर पुढच्या वेळी त्यांनी लोकसेवा आयोगाची परीक्षा देत देशात १२४वा क्रमांक पटकावला. ज्यानंतर त्यांनी मसूरी स्थित 'नॅशनल अकॅडमी ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन' येथे प्रशिक्षण घेतलं. 


दोन वर्षांच्या या कालावधीनंतर अखेर पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा एकंदर दृष्टीकोन आणि एखाद्या गोष्टीप्रती असणाऱी जिद्द पाहता ही गोष्ट इतरांसाठीही प्रेरणादायी असेल असं म्हणायला हरकत नाही.