Delhi Pune Flight Delay : दिल्ली ते पुणे हा विमान प्रवास अवघ्या दोन तासांचा आहे. तरीदेखील दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (IX-1176) विमानातील सुमारे 200 प्रवाशांना एक वेगळ्या आणि त्रासदायक अनुभवाला सामोरे जावं लागलं. शुक्रवारी रात्री दिल्लीहून पुण्यासाठी रात्री 10 वाजता निघालेले विमान हे पुण्यात सकाळी 10 वाजता पोहोचलं. विमानात तांत्रिक बिघाड सांगून पहाटे दोन तासांसाठी खाली उतरवून बसमध्ये फिरवून पुन्हा विमानतळात बसवलं. एअर इंडिया विमानात प्रवाशांचा नाहक हाल झाले. त्यांना सात तासांपेक्षा जास्त वेळ बसून ठेवण्यात आलं. हे सगळं घडलं दिल्ली विमानतळावर रात्रीचा वेळी. धुक्यामुळे प्रवाशांना केवळ अडचणींचाच सामना करावा लागला नाही, तर विमानात सात तासांपेक्षा जास्त वेळ बसून पुन्हा सुरक्षा तपासणी करावी लागली. यावेळी वयस्कर प्रवाशांसह अनेकांना मानसिक आणि शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागलंय. 


रात्रभर उड्डाण होऊ शकले नाही..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर, दिल्ली-पुणे विमान शुक्रवारी रात्री 9.40 वाजता उड्डाण करणार होते आणि रात्री 11.50 वाजता पुण्याला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र खराब हवामान आणि धुक्यामुळे रात्रभर विमान उड्डाण करू शकलं नाही. रात्री 10 वाजता प्रवाशांना फ्लाइटमध्ये बसवण्यात आलं, मात्र तासनतास प्रतीक्षा करूनही फ्लाइट टेक ऑफ झालं नाही. अखेर शनिवारी सकाळी साडेसात वाजता विमानाने उड्डाण केलं आणि सकाळी दहा वाजता पुण्यात पोहोचले.


बराच वेळ बसल्याने थकवा...


मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवाशांनी सांगितलं की, फ्लाइटमध्ये चढल्यानंतर तासभर काहीच प्रगती झाली नाही तेव्हा त्यांनी क्रू मेंबर्सना उशीर होण्याचे कारण विचारले. धुक्यामुळे दृश्यमानतेत अडचण आल्याचे उत्तर मिळाले. मात्र हा प्रश्न लवकर सुटला नाही. बराच वेळ बसून राहिल्यानंतर विमानात उपस्थित प्रवाशांना थकवा जाणवला आणि त्यांनी टर्मिनलवर परत जाण्याची मागणी केली मात्र त्यांना तिथेच थांबण्यास सांगण्यात आले. त्यांच्याकडे अनेक ज्येष्ठ नागरिक होते.
यानंतर पहाटे साडेपाच वाजता प्रवाशांना अचानक फ्लाइटमधून उतरवण्यात आले. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर प्रवाशांना बसमध्ये बसवून टर्मिनलवर नेण्यात आले आणि पुन्हा सुरक्षा तपासणी करण्यास सांगितलं. सुमारे दोन तासांच्या प्रक्रियेनंतर, ज्या विमानातून उड्डाण घेतले त्याच विमानात प्रवाशांना बसवण्यात आलं.


धुक्यामुळे उड्डाणे उशीर


या विमानातून पुण्यातील अंबादास गावंडे हा प्रवासी आपल्या कुटुंबासह प्रवास करत होता. आपला अनुभव सांगताना ते म्हणाले की, प्रवाशांना अशा स्थितीत बसून ठेवणे अत्यंत गैरसोयीचे होते. उड्डाण कर्मचारी आणि विमान कंपन्यांकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नसल्याचेही त्यांनी सांगितले. शनिवारी सकाळपर्यंत देशभरात धुक्यामुळे उड्डाणांना विलंब होत होता. दिल्ली विमानतळावर धुके आणि उड्डाणांना होणारा विलंब यामुळे प्रवाशांचेही प्रचंड हाल झाले. अनेक उड्डाणे 3 ते 5 तास उशिराने निघाली. विमानतळावर गर्दी आणि गोंधळामुळे लोक तासन्तास उभे होते. प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करत सुविधा नसल्याच्या तक्रारी केल्या.