फ्लिपकार्ट विकल्यानंतर सचिन बन्सल यांनी भरलेला इन्कम टॅक्स माहितीये?
वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टमधील व्यवहार पूर्ण झाल्यावर प्राप्तिकर विभागाने पत्र लिहून सचिन आण बिन्नी बन्सल यांच्याकडून या व्यवहाराबद्दलची सविस्तर माहिती मागविली होती.
नवी दिल्ली - गेल्यावर्षी जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी वॉलमार्टने भारतातील मोठी ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टची खरेदी केली होती. एक लाख कोटी रुपयांमध्ये वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील ७७ टक्के शेअर खरेदी केले आणि कंपनीवर ताबा मिळवला. फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी कंपनीचे शेअर विकून मोठ्या प्रमाणात फायदा कमावला होता. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये सचिन बन्सल यांनी आगाऊ कर म्हणून ६९९ कोटी रुपये जमा केले होते. यातूनच सचिन बन्सल यांना या व्यवहारातून किती मोठा फायदा झाला हे लक्षात येईल. कंपनीचे दुसरे सहसंस्थापक बिन्नी बन्सल यांनी अद्याप या व्यवहारासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.
वॉलमार्ट आणि फ्लिपकार्टमधील व्यवहार पूर्ण झाल्यावर प्राप्तिकर विभागाने पत्र लिहून सचिन आण बिन्नी बन्सल यांच्याकडून या व्यवहाराबद्दलची सविस्तर माहिती मागविली होती. त्याचबरोबर आगाऊ कराचा भरणा करण्यासंदर्भातही या दोघांकडे विचारणा करण्यात आली होती. प्राप्तिकर कायद्यातील तरतुदींनुसार सचिन आणि बिन्नी बन्सल या दोघांनाही या व्यवहारातून झालेल्या व्यक्तिगत नफ्याच्या २० टक्के रक्कम प्राप्तिकर म्हणून भरावी लागणार आहे. वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सेदारी विकत घेतली होती. एकूण १५ अब्ज डॉलरला हा व्यवहार झाला होता. त्यानंतर कंपनीने प्राप्तिकर विभागाकडे ७४४० कोटी रुपयांचा करही जमा केला होता. या व्यवहारातून लाभ झालेल्या ४६ समभागधारकांची माहितीही प्राप्तिकर विभागाने वॉलमार्टकडे मागितली. या व्यवहारात सॉफ्टबॅंक, नेसपर्स, एसेल पार्टनर्स, आणि ई-बे समवेत ४४ समभागधारकांनी आपला फ्लिपकार्टमधील हिस्सा विकला होता. त्यामध्ये सचिन आणि बिन्नी बन्सल यांनीही आपला हिस्सा विकला होता.