मी पूर्ण जबाबदारीने सांगतेय... अदानी प्रकरणावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पहिली प्रतिक्रिया
Hindenburg Research नं अदानी उद्योग समूहावर बाजारातील (Share Market) व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे
Nirmala Sitharaman : अदानी समूहाबाबतच्या (Adani Group) कथित गैरव्यवहारांबाबतचा अहवाल अमेरिकास्थित हिंडेनबर्ग संस्थेने प्रसिद्ध केल्याने गेल्या काही दिवसांपासून एकच खळबळ उडाली आहे. Hindenburg Research नं अदानी उद्योग समूहावर बाजारातील (Share Market) व्यवहारांमध्ये गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यापासून अदानी उद्योग समूहाला एकूण 120 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. याचे पडसाद देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशतानही (Budget Session 2023) उमटले आहेत. संसदेत (Parliament) अदानी प्रकरणावरून मोठा गदारोळ सुरू आहे. शुक्रवारी या गदारोळामुळे दोन्हीही सभागृहांमधील कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते.
दुसरीकडे अदानी समूहाच्या शेअर्सच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. देशाच्या बाजारपेठेची योग्य प्रकारे काळजी घेतली गेली असून अदानी समूहाबाबत सुरु असलेल्या वादाचा गुंतवणूकदारांवर परिणाम होणार नाही, अशी अपेक्षा निर्मला सीतारमण यांनी व्यक्त केली आहे. त्याचवेळी अर्थमंत्री सीतारमण यांनी एसबीआय आणि एलआयसीबाबतही गुंतवणूकदारांना आश्वस्त केले आहे.
कंपन्यांच्या प्रमुखांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा - निर्मला सीतारमण
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये निर्मला सीतारमण यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. "एका घटनेवरून काहीही ठरवणे चुकीचे आहे. एसबीआय आणि एलआयसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. इकडच्या-तिकडच्या लोकांच्या गोष्टी ऐकण्यापेक्षा या कंपन्यांच्या प्रमुखांच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवा. एसबीआय आणि एलआयसी या दोघांनीही तपशीलवार याबाबत माहिती जारी केली आहेत. सध्या दोन्ही फायद्यात असून जी काही खरेदी झाली आहे ती विहित मर्यादेतच झाली आहे. मूल्यांकन कमी होत असले तरी दोन्ही कंपन्या सध्या फायदेशीर आहेत," असे निर्मला सीतारमण म्हणाल्या.
भारतीय बँकिंग क्षेत्र सुरक्षित
भारताची स्थिती आजही पूर्वीसारखीच आहे. आमचा कामकाज चांगले आहे. सरकार स्थिर आहे आणि आम्ही बाजारावर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवत आहोत. त्यामुळे आजही गुंतवणूकदारांचा विश्वास अबाधित आहे. भारतीय बँकिंग क्षेत्र देखील अतिशय सुरक्षित स्थितीत आहे. मी हे पूर्ण जबाबदारीने सांगत आहे, असेही निर्मला सीतारमण म्हणाल्या.