मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले असले तरी गेल्या दोन महिन्यांत परदेशातून आलेले सुमारे १५ लाख प्रवासी देशभरात असून त्यांच्यावर लक्ष ठेवा, अशी सूचना मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून दिले आहेत.


मंत्रिमंडळ सचिवांच्या राज्यांना सूचना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशातून आलेले प्रवासी आणि सध्या ज्यांच्यावर लक्ष आहे असे क्वारंटाईन केलेले प्रवासी यांच्या संख्येत मोठी तफावत आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत ही तफावत मोठा धोका आहे, असा इशारा मंत्रिमंडळ सचिवांनी राज्यांना दिला आहे. १८ एप्रिल ते २३ मार्च दरम्यान १५ लाख प्रवासी अन्य देशांतून भारतात आले. या सर्वांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे, असं मंत्रिमंडळ सचिव गौबा यांनी म्हटले आहे.


बहुतांशी रुग्ण हे परदेशात प्रवास केलेले


भारतात कोरोना पॉझिटिव्ह सापडलेले बहुतांशी रुग्ण हे परदेशात प्रवास केलेले आहेत, तर काही रुग्ण हे त्यांच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांत परदेशात प्रवास करून आलेल्या १५ लाख प्रवाशांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.


परदेशातून प्रवास करून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन किंवा होम क्वारंटाईन केलेलं असलं तरी प्रत्यक्ष प्रवास करून आलेले प्रवासी आणि क्वारंटाईनमध्ये असलेले प्रवासी यांच्या संख्येत मोठी तफावत असल्याचं लक्षात आलं आहे.


 परदेश प्रवासाची माहिती काहींनी लपविली


काही ठिकाणी परदेश प्रवास करून आलेल्या लोकांनी माहिती लपविली असल्याचंही लक्षात आले आहे. तसेच काही जण परदेशातून आल्यानंतर अनेक जणांना भेटल्याचंही लक्षात आलं आहे. एवढंच नाही, तर त्यांच्या संपर्कात आलेल्या काही जणांना कोरोना झाल्याचं लक्षात आलं आहे. त्यामुळे परदेशातून आलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवा, असं केंद्र सरकारने राज्य सरकारांना कळवले आहे.