आनंद महिंद्रा यांना फोल्डिंग जिन्याची भूरळ, व्हिडीओ शेअर करत केलं कौतुक
अहमदनगर शहरातील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान यांनी बनविलेल्या फोल्डिंग जिन्याचे कौतुक थेट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.
Trending Jugaad Video: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. यातील काही व्हिडीओ नावीन्यपूर्ण असतात. उद्योगपती आनंद महिंद्रा ट्विटरवर काही ना काही शेअर करत असतात. एवढेच नाही तर ते त्यांच्या चाहत्यांना उत्तरेही देतो. आता त्यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही कामाचं कौतुक कराल. अहमदनगर शहरातील दरबार फेब्रिकेशनच्या समीर बागवान यांनी बनविलेल्या फोल्डिंग जिन्याचे कौतुक थेट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.
आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "असाधारण. इतकं साधे असूनही क्रिएटिव्ह आहे. जागेचा व्यवस्थितरित्या वापर करून तयार केलेला जिना भिंतीवर व्यवस्थितरित्या राहतो. स्कॅन्डिनेव्हियन डिझाइनरांना हेवा वाटला पाहिजे !!" असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.
अहमदनगर शहरातील जुन्या महापालिकेच्या समोर अतिशय अरुंद गल्लीत ई सेवा केंद्र आहे या केंद्रात जाण्यासाठी छोटा जिना आहे. मात्र नागरिकांना गल्लीत जाण्याची अडचण होत असल्याने समीर आणि त्यांच्या मित्रांनी हा फोल्डिंग जिना बनवला. हा जिना फोल्ड करून भिंतीला लावता येतो. त्यामुळे आवश्यक असेल तेव्हा जिन्याचा वापर करता येतो आणि इतर वेळी तो भिंतीला लॉक करण्याची सोय आहे. हा जिना बनविल्यानंतर समीर यांच्या मित्रांनी या फोल्डिंग जिन्याचा व्हिडीओ बनवला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पहिला आणि त्यांनी या कामाचे कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत दोन लाख लोकांनी पाहिला आहे तर या व्हिडीओवर पाच हजारांपेक्षा अधिक लोकांनी कमेंट केल्यात. थेट आनंद महिंद्रा यांनी आपल्या कामाचे कौतुक केल्याने आपल्याला आणखी चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळाली असल्याचे समीर बागवान यांनी म्हटलंय.