`म्हणून जवानांनी हत्यारं चालवली नाहीत`, परराष्ट्र मंत्र्यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर
चीनच्या सीमेवर भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले होते.
नवी दिल्ली : चीनच्या सीमेवर भारतीय जवान शहीद झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्र सरकारला काही प्रश्न विचारले होते. गलवानमध्ये सैनिकांना हत्यारं नसताना का पाठवण्यात आलं? असं ट्विट राहुल गांधींनी केलं होतं. राहुल गांधी यांच्या या ट्विटला परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
'पहिले आपल्याला तथ्य समजून घेणं गरजेचं आहे. सीमेवर असलेल्या सैनिकांकडे नेहमीच हत्यारं असतात, खासकरून जेव्हा ते आपली जागा सोडतात. १५ जूनला गलवानमध्ये असलेल्या जवानांनी पण असंच केलं. पण १९९६ आणि २००५ सालच्या करारानुसार एलएसीवर झटापटीच्या दरम्यान हत्यारांचा वापर केला जात नाही,' असं जयशंकर म्हणाले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत-चीन सीमावादावरुन मोदी सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधींनी याबाबतचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेयर केला होता. 'बंधू आणि भगिनींनो चीनने भारताच्या शस्त्रहीन सैनिकांची हत्या करून मोठा अपराध केला आहे. भारताच्या वीर जवानांना हत्याराशिवाय धोक्याकडे कोणी आणि का पाठवलं? असा माझा प्रश्न आहे. याला जबाबदार कोण आहे?' असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले होते.
दुसरीकडे भाजपनेही यावरुन राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. 'राहुल गांधी काँग्रेस सरकारचे करार विसरले आहेत. त्यांना भारत-चीन वाद काय आहे हे माहिती नाही. विरोधाच्या राजकारणामुळे नागरिक संतप्त आहेत. पंतप्रधानांवर टीका ही देशावर टीका आहे. सर्वपक्षीय बैठकीआधी पंतप्रधानांवर प्रश्न का?' अशी टीका भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी केली आहे.