मुंबई : लसीसंदर्भात एक चांगली बातमी आहे. जॉन्सन अॅन्ड जॉन्सन कंपनीची सिंगल डोस लसीला भारतात आतात्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. या मंजूरीमुळे भारतात सध्या परवानगी असलेल्या लसींमध्ये अजून एका लसीची भर झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसुख मांडविया यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. मनसुख मांडविया त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, "भारताने आपलं व्हॅक्सिन बास्केटची व्याप्ती वाढवली आहे. जॉन्सन अॅन्ड जॉन्सनच्या सिंगल डोस कोरोना लसीला भारतामध्ये आपात्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यात आली आहे. आता भारतात कोरोनाविरोधात 5 लसींना परवानगी मिळालेली आहे. यामुळे देशाच्या कोरोनाविरोधातील लढ्याला पाठबळ मिळण्यास मदत होणार आहे."


भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळालेली जॉन्सन अॅन्ड जॉन्सन ही पहिलीच सिंगल डोस लस आहे. शिवाय दोनच दिवसांपूर्वी कंपनीने केंद्र सरकारकडे मंजूरीसाठीचा प्रस्ताव पाठवला होता. या कंपनीच्या दाव्याप्रमाणे या लसीचा केवळ एकच डोस प्रभावी आहे. कोरोनावर जॉन्सन अॅन्ड जॉन्सन लस 85 टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. 


दरम्यान भारतात आतापर्यंत 50,10,09,609 लोकांना कोरोना लस देण्यात आलेली आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात 49,55,138 लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांमध्ये 38,628 नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 40,017 कोरोनाची लागण झालेले रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यादरम्यान 617 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.