Tiger Chase Leopard: जंगलात जो शक्तिशाली आणि फिट असतो तोच टिकतो हा नियम आहे. प्रत्येक शक्तिशाली प्राणी आपल्यापेक्षा दुबळ्या प्राण्याची शिकार करत असतो. त्यामुळे जंगलात जगायचं असेल तर चपळाईही तितकीच महत्त्वाची असते. त्यातही प्रत्येक प्राण्याने आपला परिसर आखलेला असतो. तिथे जर इतरांनी घुसखोरी केली तर अस्तित्वासाठी लढाई सुरु होते. यावेळी जर तुम्ही फिट किंवा चपळ नसाल तर जीव जाणार हे नक्की असतं. असंच काहीसं दाखवणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भारतीय वन अधिकारी सुसंता नंदा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत वाघाने बिबट्याचा पाठलाग करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की, "वाघांचं अधिराज्य असणाऱ्या परिसरात बिबट्याने अशाप्रकारे आपला जीव वाचवला. वाघही सहजपणे झाडावर चढू शकतो. आपल्या धारदार आणि तीक्ष्ण पंजांच्या सहाय्याने झाडाची चांगली पकड घेत तो वर चढतो. पण जसजसे ते मोठे होतात त्यांचं वजन यात अडथळा ठरतं. त्यामुळे जगण्यासाठी सडपातळ राहा".


30 सेकंदांच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये वाघ बिबट्याचा पाठलाग करण्यासाठी दबक्या पावलांना पुढे सरकत असल्याचं दिसत आहे. काही वेळात वाघ वायूवेगाने बिबट्याच्या दिशेने धाव घेतो.  पण बिबट्या त्याच वेगाने झाडावर चढतो आणि टोक गाठतो. बिबट्याचा पाठलाग करताना वाघही झाडावर चढतो, पण काही सेकंदाने त्याला आपण अजून वर जाऊ शकत नाही याची जाणीव होते आणि हार पत्करत खाली उतरतो. 



हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून चार लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत असून कमेंट्स करत आहेत. एका युजरने बिबट्याच्या वेगाचं कौतुक करताना हे जबरदस्त असल्याचं म्हटलं आहे. तसंच एकाने हा व्हिडीओ श्वास रोखणारा असल्याचं म्हटलं आहे. तर एकाने बिबट्याला झाडावर चढताना आपल्या ह्दयाचे ठोके ऐकू आले असतील अशी कमेंट केली आहे.