बायच्यूंग भूतियाने सोडली ममतांची साथ, टीएमसीचा दिला राजीनामा
पश्चिम बंगालमधील सत्ताधारी ममता बॅनर्जीच्या तृणमुल काँग्रेससाठी (टीएमसी) काहीशी धक्कादायक बातमी आहे.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्ताधारी ममता बॅनर्जीच्या तृणमुल काँग्रेससाठी (टीएमसी) काहीशी धक्कादायक बातमी आहे. फुटबॉलपटू बायच्यूंग भूतियाने तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. आगामी पंचायत निवडणुकीपूर्वी टीएमसीला बसलेला हा एक धक्का असल्याचे मानले जात आहे.
सोशल मीडियावरून केली घोषणा
दरम्यान, भूतियाने सोशल साईटवरून केलेल्या घोषणेत म्हटले आहे की, आज मी तृणमुल काँग्रेसच्या सर्व पदांचा अधिकृतरित्या राजीनामा दिला आहे. त्यामुळे या पक्षाशी राजकीयदृष्ट्या माझा कोणताच संबंध राहिलेला नाही नाही. तसेच, सध्या मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही.
दोन वेळा तिकीट मिळूनही पराभूत
४१ वर्षीय भूतीया नव्वदच्या दशकात भारतीय फुटबॉलचा प्रमुख चेहरा राहिला होता. दरम्यान, त्याच्या या घोषणेवर प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनी संपर्क साधला असता त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. भूतीयाने यापूर्वी तृणमूलचे उमेदवार विजयी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. तसेच, पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची लाट असतानाही भूतिया दार्जिलींग येथून लोकसभा आणि सिलीगुडी येथून विधानसभा निवडणुक जिकण्या असमर्थ राहिले.