कोलकाता : माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांचं निधन झालयं. ते ८९ वर्षांचे होते. चॅटर्जी यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती आणखीनच बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. हे वृत्त समजल्यानंतर डाव्या पक्षाच्या अनेक नेत्यांनी चॅटर्जींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात धाव घेतली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. कोलकात्याच्या रुग्णालयात त्यांनी अखेर श्वास घेतला. जून महिन्यात अंतर्गत रक्तस्त्रावामुळे झाल्यामुळे चॅटर्जी यांच्यावर उपचार सुरु होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली.


दहावेळा लोकसभेवर 


भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते असलेले सोमनाथ चॅटर्जी दहावेळा लोकसभेवर निवडून गेले होते. २००४ ते २००९ या काळात त्यांनी लोकसभेचे अध्यक्षपद भुषविले. २००८ मध्ये अणुकराराच्या मुद्द्यावरुन भारतीय कम्युनिस्ट पक्षाने यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यावेळी चॅटर्जी यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यामुळे पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. 


लोकप्रिय खासदार 


एक उत्कृष्ट संसदपटू असणारे चॅटर्जी हे प्रथितयश वकील आणि लोकप्रिय खासदारही होते. १९७१ ते २००९ या काळात केवळ एक अपवाद वगळता ते सातत्याने लोकसभेवर निवडून गेले. १९८४ मध्ये ममता बॅनर्जी यांनी त्यांना पराभूत केले होते.