नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी शनिवारी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी राफेल विमान खरेदी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीनचीट दिली होती. त्यावर नाराज होत तारिक अन्वर यांनी पक्षाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तारिक अन्वर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य होते. त्यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांना धक्का बसला होता. 


मात्र, तारिक अन्वर आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिले. फ्रान्सच्या माजी राष्ट्रपतींनी राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचे सांगितले. परंतु, शरद पवारांनी या प्रकरणात मोदींना क्लीनचीट दिली. ही गोष्ट मला पटली नाही. त्यामुळे मी पक्षाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला. पवार साहेबांसाठी असलेला आदर कायम राहील. काँग्रेसची विचारधारा आम्ही कधीही सोडलेली नाही. राष्ट्रवादी पक्ष हा काँग्रेसचाच एक भाग आहे, असेही तारिक अन्वर यांनी त्यावेळी म्हटले होते.