भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी कालवश...
भारतीय राजकारणातील एका तेजस्वी पर्वाचा अंत
नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वाजपेयी हे 93 वर्षांचे होते. वाजपेयींच्या निधनामुळे भारतीय राजकारणाचा दृढनिश्यची आणि संयमी चेहरा हरपला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री आज सकाळपासून उपस्थित होते.
अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशिया नावाच्या आजाराने ग्रासले होते. २००९ पासून ते व्हिलचेअरवर होते. ११ जूनला किडनीच्या संसर्गामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६, १९९८ आणि १९९९ या काळात भारताचे पंतप्रधानपद भुषविले. २०१५ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
तत्पूर्वी आज सकाळपासूनच एम्स रुग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भाजप नेत्यांची रीघ लागली होती. सर्वप्रथम उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू एम्समध्ये पोहोचले. वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर ते माघारी परतले. त्यानंतर जे.पी.नड्डा, मुख्तार अब्बास नक्वी, प्रकाश जावडेकर, अमित शहा, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हेदेखील एम्समध्ये पोहोचले. यानंतर वाजपेयी यांचे नातेवाईकही रुग्णालयात दाखल झाले होते.
अटलबिहारी वाजपेयी यांची प्रकृती खालावल्यामुळे बुधवारपासून त्यांना जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटरवर) ठेवण्यात आले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाजपेंयींच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्स गाठले. तब्बल ४० मिनिटे पंतप्रधान मोदी याठिकाणी होती. पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मंत्र्यांनी एम्समध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यावेळी डॉक्टरांनी प्रसिद्ध केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये वाजपेयींची प्रकृती चिंताजनक असल्याचे म्हटले होते. तेव्हापासून अनेकांना वाजपेयींच्या प्रकृतीची काळजी लागून राहिली होती.