मुंबई : देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. दिल्लीत एका कार्यक्रमात त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं देत हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा राखत  इतरांसमोर आपल्या आचरणातून आदर्श ठेवला पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील ज्या राज्यांमध्ये भाजपाचे सरकार नाही, अशा राज्यांच्या दौऱ्यावर असतेवेळी मोदींकडून केली जाणारी वक्तव्य आणि त्यांच्याकडून वापरली जाणारी भाषा याविषयीही त्यांनी सजग रहावं, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. 


देशाच्या पंतप्रधानपदी असणाऱ्या व्यक्तीने आपल्या आचरणातून इतरांसमोर आदर्श प्रस्थापित करावा. कारण, ती व्यक्ती देशातील नागरिकांचं प्रतिनिधीत्वं करत असते. त्यामुळे आपण पंतप्रधान पदावर आहोत, याचं भान त्या व्यक्तीला असणं अपेक्षित आहे, असं म्हणत सिंग यांनी मोदींना हा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 


काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मनिष तिवारी यांच्या 'फेबल्स ऑफ फ्रॅक्चर्ड टाईम्स' या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सिंग यांनी हजेरी लावली होती. त्याचवेळी त्यांनी हे लक्षवेधी वक्तव्यं केलं. 




काँग्रेस सत्तेत असतेवेळी भाजपाकडून आता बिगर भाजपा सत्ताधारी राज्यांसोबत जसा व्यवहार केला जातो, तसा भेदभावाचा व्यवहार कधीच करण्यात आला नव्हता, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे आता आदर्श प्रस्थापित करण्याचा सिंग यांचा सल्ला ऐकता मोदी यावर आपल्या भाषणातून काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.