`आकाशातून येणार नाहीय ५ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था`
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली : ५ ट्रिलीयन डॉलरची अर्थव्यवस्था काही आकाशातून पडणार नाही असे म्हणत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. जर भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर होणार असेल तर यामागे एक मजबूत आधार आहे. हा आधार १.८ ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचा आहे ज्याची सुरुवात शुन्यातून झाल्याचेही ते म्हणाले. प्रणव मुखर्जी यांनी फार कमीवेळा अशा तिखट शब्दात भूमिका मांडली आहे. दिल्लीतील एका भाषणा दरम्यान त्यांनी या मुद्द्याला हात घातला.
जे लोक गेली ५०-५५ वर्षे कॉंग्रेसची हेटाळणी करत आहेत त्यांना आम्ही कोणत्या स्थितीत कामाला सुरुवात केली आणि कुठपर्यंत अर्थव्यवस्था नेऊन ठेवली याबद्दल माहीत नसेल असेही त्यांनी स्पष्ट केले. २०२४ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर होईल असे अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले.
पण इतकी मोठी अर्थव्यवस्था काही स्वर्गातून आली नाही. ही अर्थव्यवस्था इंग्रजांनी बनवली नाही तर ते गेल्यानंतर भारतीयांनी बनवल्याचे ते म्हणाले.
२०१२ मध्ये राष्ट्रपती बनण्याआधी प्रणव मुखर्जी १९८० च्या दशकापासून काँग्रेसच्या सरकारमध्ये अर्थमंत्री राहिले आहेत. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इतरांनी मिळून आयआयटी, बॅंकिंग नेटवर्क इस्त्रो, आयआयएम सारख्या संस्थांची स्थापना केली. दिवस दुप्पट आणि रात्र चौप्पट करत सर्वांनी कामे केली. डॉ.मनमोहन सिंह आणि नरसिंह राव यांनी अर्थव्यवस्थेचे उदारीकरण करत ती पुढे नेली. हा तोच पाया आहे ज्यावर आज ५ ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा दावा केला जात असल्याचे प्रणव मुखर्जी म्हणाले.