नवी दिल्ली : माजी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी हे ९३ वर्षांचे होते.  वाजपेयींच्या निधनामुळे भारतीय राजकारणाचा दृढनिश्यची आणि संयमी चेहरा हरपल्याची प्रतिक्रिया देशातून व्यक्त होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अटल बिहारी वाजपेयी यांना डिमेंशिया नावाचा आजार जडला होता. २००९ पासून ते व्हिलचेअरवर होते. ११ जूनला किडनीच्या संसर्गामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यांची प्रकृती सातत्याने ढासळत गेली. आज १६ ऑगस्ट २०१८ रोजी संध्याकाळी  ५ वाजून ५ मिनिटांनी त्यांचे निधन झाले.


- अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ ला १३ दिवस, १९९८ ला १३ महिने आणि १९९९ ला पूर्ण पाच वर्ष (२००४) असे त्यांनी पंतप्रधानपद भूषविले. २०१५ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.  तर वाजपेयींचा जन्मदिवस हा देशात सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो.


- अटल बिहारी वाजपेयी  यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ ला झाला. अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे संस्थापक सदस्य असून ते भाजपचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. अटल बिहारी वाजपेयी भारताचे १० वे पंतप्रधान होते.  


- १९९६ साली पहिल्यांदा भाजपाने अन्य पक्षांच्या साथीने केंद्रात सरकार बनवले. वाजपेयींचा पंतप्रधानपदाचा पहिला कार्यकाळ फक्त १३ दिवसांचा होता. 


- १९९८ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले.  भाजपाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीची स्थापना झाली. जे सरकार १३ महिने हे चालले. जयललिता यांच्या पक्षाने पाठिंबा काढल्यामुळे १७ एप्रिल १९९९ रोजी अवघ्या एका मताने वाजपेयी सरकार कोसळले. त्यानंतर पुन्हा सार्वत्रिक निवडणुका झाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले.


- वाजपेयी यांनी छोट्या पक्षांना एकत्र घेऊन पाच वर्षे सरकार चालविले.  यावेळी एनडीएचा प्रयोग यशस्वी झाला आणि वाजपेयींनी १९९९ ते २००४ असा पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला.


- पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान ठरले. 


- अटल बिहारी वाजपेयी तब्बल दहावेळा लोकसभेवर आणि दोन वेळा राज्यसभेवर निवडून गेले.  २००९ पर्यंत ते उत्तर प्रदेश लखनऊमधून निवडून लोकसभेवर गेले.  


- मोरारजी देसाई यांच्या जनता सरकारमध्ये अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री होते. जनता पक्षाचे आघाडी सरकार कोसळल्यानंतर वाजपेयींनी १९८० साली भारतीय जनता पार्टीची स्थापना केली.


- २५ डिसेंबर २०१४ रोजी वाजपेयींच्या जन्मदिनी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींना भारत रत्न पुरस्काराची घोषणा केली. भारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. २७ मार्च २०१५ रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी वाजपेयींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.