नवी दिल्ली: उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशा दोन राज्यांचे मुख्यमंत्रीपद भुषविलेल्या एन.डी. तिवारी यांचे गुरुवारी दिल्लीत निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. गेल्या महिन्यात पक्षाघाताचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. साकेत येथील मॅक्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. २६ सप्टेंबरला त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. तेव्हापासून तिवारी यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एन.डी. तिवारी यांनी १९६३ साली काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड अशा दोन राज्यांचे मुख्यमंत्रीपद भुषवणारे ते देशातील एकमेव नेते आहेत. 


गांधी घराण्याशी जवळीक असल्याने १९७६ साली ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९८४ साली ते दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. 


मध्यंतरीच्या काळात राजीव गांधी यांनी तिवारी यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केले. मात्र, ते १९८८ साली पुन्हा सत्तेत आले. 


मात्र, १९८९ साली काँग्रेसच्या झालेल्या ऐतिहासिक पराभवामुळे तिवारी यांनी पुढील काळात पुन्हा वर्चस्व प्रस्थापिक करायला बराच संघर्ष करावा लागला. 



तर १९८० साली ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. १९८५ साली त्यांनी काँग्रेसने राज्यसभेची खासदारकी दिली. 


१९८६-८७ या काळात त्यांनी राजीव गांधी सरकारच्या मंत्रिमंडळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारीही सांभाळली होती. 


यानंतर २००२ साली ते उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. उत्तराखंडमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते एकमेव मुख्यमंत्री आहेत. 


याशिवाय, २००७ ते २००९ या काळात ते आंध्र प्रदेशचे राज्यपालही होते. मात्र, या काळात राजभवनात काही महिलांसोबत ते आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले. त्यावेळी एन. डी. तिवारी यांनी प्रकृतीचे कारण देत राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता.