रांची : छत्तीसगडमधल्या बिजापूर भागात नक्षलवाद्यांनी लावलेल्या आयईडी बॉम्बच्या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे चार जवान शहीद झाले. त्यामध्ये एक सहाय्यक उप निरीक्षक, १ हेड कॉन्स्टेबल आणि दोघा कॉन्स्टेबल्सचा समावेश आहे. बिजापूरच्या अवापल्ली पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक पी. सुंदर राज यांनी दिली. भूसुरुंग विरोधी वाहनातून सहा पोलीस कर्मचारी ड्युटीसाठी निघाले होते. त्याचवेळी नक्षलवाद्यांनी घात लावून त्यांची जीप बॉम्बस्फोटानं उडवून दिली. छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून, या धामधुमीतच नक्षलवाद्यांनी डोकं वर काढले आहे.



शक्तीशाली स्फोटामध्ये जीपचा चक्काचूर झाला. या गाडीमध्ये सहा जण होते. घटनास्थळी तात्काळ अतिरिक्त कुमक पाठवण्यात आली आहे. छत्तीसगडमध्ये १२ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.