ग्राहकांनो, तुमचा आधार क्रमांक शेअर करताना सावधान!
जर तुम्हालाही तुमचा आधार क्रमांक बँक अकाऊंटशी लिंक करण्यासाठी `बँक अधिकारी` म्हणून फोन आला असेल तर सावधान.
मुंबई : जर तुम्हालाही तुमचा आधार क्रमांक बँक अकाऊंटशी लिंक करण्यासाठी 'बँक अधिकारी' म्हणून फोन आला असेल तर सावधान.
आपण बँक अधिकारी आहोत आणि आधार क्रमांक बँक अकाऊंटशी जोडण्यासाठी फोन केलेला आहे, असं एखाद्या व्यक्तीनं फोनवर सांगितलं तर त्यावर विश्वास ठेऊ नका... तुम्हाला जाळ्यात फसवण्याचा हा एक मार्ग आहे.
लखनऊमध्ये याच मार्गानं पाच सरकारी कर्मचाऱ्यांना तब्बल अडीच लाखांचा गंडा घालण्यात आलाय. या सर्वांनी आपला आधार क्रमांक भामट्यांसोबत फोनवर शेअर केला होता.
तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, फोन करून भामट्यांनी त्यांच्याकडे आधार क्रमांकाची मागणी केली... आधार क्रमांक बँक अकाऊंटशी जोडणार असल्याचं सांगत त्यांनी ही बतावणी केली होती. त्यानंतर या भामट्यांनी डेबिट कार्ड क्रमांकही मागितला... तक्रारकर्त्यांच्या मोबाईलवर आलेला 'ओटीपी'ही भामट्यांनी विचारून घेतला... त्यानंतर काही वेळातच तक्रारकर्त्यांच्या अकाऊंटवरून पैसे गूल झाले होते.
फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या सर्वांनी सायबर सेलकडे आपली तक्रार नोंदवली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.