नवी दिल्ली : देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता देशातील सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. परंतू आता यंदाच्या शैक्षणिक सत्रासाठी शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारने हलचाली सुरू केल्या आहेत. सर्व प्रथम सीबीएसई बोर्डाचे निकाल घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर दुसरीकडे १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे निकाल काही दिवसांच्या अंतरावर घोषित करण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे कोरोना व्हायरसचा प्रकोप लक्षात घेत ऑगस्ट महिन्याच्या १५ तारखेला  शाळा पुन्हा नव्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या विचारात सरकार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आम्ही अशी आशा करतो की १०वी आणि १२वीचे निकाल १५ ऑगस्ट पर्यंत लागतील. शिवाय ऑगस्ट महिन्यात शाळा पुन्हा उघडण्याच्या निर्णयावर देखील चर्चा सुरू आहे. परंतु सद्य परिस्थिती लक्षात घेवून योग्य तो निर्णय घेतला जाईल.' असं ते म्हणाले. 


'या' नियमांचे पालन करणं अनिवार्य असणार आहे. 
रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकांना मास्कचा आणि ग्लब्सचा नियमित वापर करणं अनिवार्य असणार आहे. शिवाय प्रत्येक शाळांमध्ये थर्मल स्कॅनर बसविण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या सर्व गोष्टीवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवण्यात येणार आहे. शाळा किंवा महाविद्यालयांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात आहे की नाही याकडे प्रशासनाचं लक्ष असणार आहे.