बंगळुरू : कर्नाटकमध्ये निवडणूक निकालानंतर भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष बनला आहे, पण भाजपला बहुमत मिळालेलं नाही. तर काँग्रेस आणि जेडीएसनं मिळून कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. आपल्याकडे ११७ आमदारांचा पाठिंबा असल्याचं काँग्रेस आणि जेडीएसनं सांगितलं आहे. तर तिकडे भाजपनंही सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं राज्यात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. एचडी कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. कर्नाटकच्या या निवडणुकीत कुमारस्वामी किंगमेकर ठरतील असा अंदाज आधीपासून वर्तवण्यात येत होता पण आता ते किंग मेकर नाही तर किंग ठरतील अशी शक्यता आहे.


वडिल-मुलांच्या नात्यात दुरावा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एचडी कुमारस्वामी आणि त्यांचे वडिल एचडी देवेगौडा यांच्या नात्यांमध्ये कर्नाटकच्या प्रचारादरम्यान दुरावा आला होता. कुमारस्वामी भाजपबरोबर जातील, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. तेव्हा कुमारस्वामी भाजपसोबत गेले तर त्यांच्यासोबतचे संबंध तोडून टाकू अशी कठोर भूमिका देवेगौडा यांनी घेतली होती. कर्नाटकच्या प्रचारादरम्यान मोदींनी देवेगौडांचं कौतुक केलं होतं, तेव्हाही आपण भाजपसोबत जाणार नाही, असं देवेगौडांनी स्पष्ट केलं होतं. देवेगौडांनी त्यांच्या मुलावर अनेकवेळा पक्षाचं आणि आपलं नाव खराब करण्याचा आरोप केला होता. २००८ साली कर्नाटकची सत्ता भाजपकडे जायलाही देवेगौडांनी कुमारस्वामींना जबाबदार धरलं होतं.


कोण आहेत कुमारस्वामी?


- एचडी कुमारस्वामी जेडीएस नेते आणि माजी पंतप्रधान देवेगौडांचे पूत्र आहेत.


- कुमारस्वामी २००६ ते २००७मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.


- कुमारस्वामी कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये निर्माता आणि वितरक म्हणूनही काम करतात.


- कुमारस्वामींना कुमारअण्णा नावानंही ओळखलं जातं.


- कुमारस्वामींनी बंगळुरूच्या जयनगरमधल्या नॅशनल कॉलेजमधून B.Sc.चं शिक्षण पूर्ण केलं.


- कुमारस्वामींकडे ४२ कोटी ९१ लाख रुपयांची संपत्ती आहे.


- कुमारस्वामींच्या पत्नीनं १२४ कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली आहे. २०१३ सालच्या तुलनेत ही संपत्ती २० कोटींनी जास्त आहे.


- कर्नाटक निवडणुकीत कुमारस्वामी सगळ्यात श्रीमंत उमेदवार होते.


याआधीही काँग्रेससोबत बनवलं सरकार


याआधी २००४ साली जेडीएस आणि काँग्रेसनं सरकार बनवलं होतं. काँग्रेसच्या धरमसिंह यांना त्यावेळी मुख्यमंत्री बनवलं होतं. पण २००६ साली जेडीएस या सरकारमधून बाहेर पडली. यानंतर त्यांनी भाजपसोबत युती केली. यानंतर कुमारस्वामी मुख्यमंत्री बनले पण पुढच्याच वर्षी ते भाजपपासून लांब गेले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.