नवी दिल्ली : भाजप खासदार (BJP MP) वरुण गांधी (Varun Gandhi) तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश करण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात TMC सुप्रीमो ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली भेटीदरम्यान चर्चा पुढे जाऊ शकते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीएसमधून बसपामध्ये दाखल झालेले खासदार दानिश अली देखील टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात. विशेष म्हणजे वरुण गांधी भाजपवर नाराज आहेत. त्यांची आई मनेका गांधी आणि त्यांना भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळालेले नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, ते आता भाजप सोडण्याचा विचार करत आहेत. अशा स्थितीत त्यांना नव्या राजकीय व्यासपीठाची गरज भासणार आहे. काँग्रेसमध्ये जाणे त्यांना शक्य नाही. अशा परिस्थितीत ते टीएमसीच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे वरुण गांधी यांनी नुकताच लखीमपूर हिंसाचाराचा निषेध केला होता. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त नथुराम गोडसेविरोधातही आवाज उठवला होता.


खरे तर त्रिपुरा आणि गोव्यानंतर तृणमूल काँग्रेस उत्तर प्रदेश, आसाम आणि मणिपूर या आणखी तीन राज्यांमध्ये संघटनात्मक विस्ताराच्या तयारीत आहे. या संदर्भात त्या राज्यांमधून तृणमूलमध्ये सामील झालेल्या विविध पक्षांच्या नेत्यांनाही राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुइझिन्हो फालेरो 29 सप्टेंबर रोजी कोलकाता येथे आले होते आणि आपल्या समर्थकांसह टीएमसीमध्ये सामील झाले होते. त्यांची टीएमसीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 


25 ऑक्टोबर रोजी दिवंगत काँग्रेस नेते कमलापती त्रिपाठी यांचे नातू राजेशपती त्रिपाठी आणि त्यांचा मुलगा ललितेशपती त्रिपाठी यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्याच वेळी, चित्रपट अभिनेत्री नफिसा अली, टेनिस स्टार लिएंडर पेस यांनी ममताच्या गोवा दौऱ्यात टीएमसीमध्ये प्रवेश केला.


विशेष म्हणजे लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराच्या वेळी पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. याआधीही त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सातत्याने पत्र लिहून उसाच्या भावात वाढ करण्याची मागणी केली होती. आता माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने केलेल्या भाषणाचा व्हिडिओ ट्विट करून वरुण गांधींनी अटलजी हे मोठ्या मनाचे नेते असल्याचे लिहिले आहे. त्यांनी शेतकरी आंदोलनाचा संदर्भ दिला. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून नुकतेच हकालपट्टी झालेले वरुण गांधी हे शेतकरी आंदोलनासाठी सातत्याने सरकारला घेरत आहेत.