अतीक अहमदने मृत्यूच्या काही सेकंद आधी कोणाला केला होता इशारा? व्हायरल होतोय हा Video
Atiq Ahmed Viral Video: गँगस्टर अतीक अहमदचा (Atiq Ahmed) एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत अतीक अहमद पोलिसांच्या जीपमधून खाली उतरताना कोणाला तरी इशारा करताना दिसत आहे. हत्येच्या काही सेकंदापूर्वीच्या या व्हिडीओ पोलीस सध्या चौकशी करत आहेत.
Atiq Ahmed Last Video: उमेश पाल (Umesh Pal) हत्याकांड प्रकरणी अटकेत असलेला गँगस्टर अतीक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची पोलिसांसमोरच गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गोळीबार करणाऱ्या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींना चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. पोलीस सध्या आरोपींची चौकशी करत असून काही मोठे खुलासे करण्यात आले आहेत. आरोपींनी केलेल्या खुलाशांच्या आधारे विशेष तपास पथक (SIT) पुढील तपास करत आहे.
यादरम्यान अतीक अहमदचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ अतीक अहमदची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याच्या काही सेकंदापूर्वीचा आहे. व्हिडीओत अतीक अहमद कॉल्विन रुग्णालयाच्या गेटवर पोलिसांच्या जीपमधून खाली उतरताना काही सेकंद थांबला होता असं दिसत आहे. यावेळी त्याची नजर रुग्णालयाकडे होती. तो काही वेळ तिथे पाहत होता. यानंतर त्याने डोकं हलवत इशारा केला आणि नंतर गाडीतून खाली उतरला. यानंतर जेव्हा अतीक अहमद रुग्णालयाच्या आवारात पोहोचला तेव्हा त्याच्यावर पत्रकार म्हणून आलेल्या आरोपींनी गोळ्या झाडल्या.
हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अतीक अहमद नेमका कोणाकडे पाहून इशारा करत होता असा प्रश्न निर्माण होत आहे.
आरोपींचे पोलिसांकडे धक्कादायक खुलासे
तिन्ही आरोपींनी एकाच वेळी अतीक अहमदवर गोळीबार केला होता. यामुळे नेमकं त्यांच्याशी कोण संपर्क साधत होतं असा प्रश्न पोलिसांसमोर होता. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनी सिंग स्वत: आरोपी आणि माफिया सुंदर भाटी गँगच्या संपर्कात राहिला आहे. हमीरपूर जेलमध्ये सनी सिंग सुंदर भाटी गँगच्या संपर्कात आला होता. सनी सिंगनेच लवलेश तिवारी आणि अरुण मौर्य यांना हत्येत सहभागी करुन घेतलं.
पोलिसांना आरीपींकडे महागडी पिस्तूलं सापडली होती. याबद्दल अरुण मौर्य याने खुलासा करताना एका मित्राने दिल्याचं सांगितलं. आपल्याला हे पिस्तूल इतकं महाग आहे याची कल्पना नव्हती, पण याच्याने गोळी घातल्यानंतर कोणीही जिवंत राहणार नाही हे माहिती होतं असं त्याने म्हटलं आहे. तर शूटर सनी सिंगने एका गँगस्टरने आपल्याला पिस्तूल दिल्याचं म्हटलं आहे. दिल्लीत 2021 ला या गँगस्टरची हत्या करण्यात आली होती.
दरम्यान आरोपींनी 14 एप्रिललाही अतीक अहमदची हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. अतीकला कोर्टात नेलं जात असताना त्याला ठार करण्याची योजना होती. पण प्रचंड पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांनी माघार घेतली होती. प्रसिद्धीसाठी आपण अतीकची हत्या केल्याचा त्यांचा दावा आहे.