GAS Price: गॅस सिलिंडरच्या किमती लवकरच कमी होणार! सरकारनं उचललं महत्त्वपूर्ण पाऊल

गेल्या काही दिवसात स्वयंपाक गॅसच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. सिलिंडरच्या किमती कधी कमी होतील, याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे.
Gas Cylinder Price: गेल्या काही दिवसात स्वयंपाक गॅसच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाला आहे. सिलिंडरच्या किमती कधी कमी होतील, याकडे नागरिकांचं लक्ष लागून आहे. असं असताना सर्वसामान्य नागरिकांना (Common Man) दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. पेट्रोलियम आणि वायू मंत्रालयाने एक आदेश जारी करून नियोजन आयोगाचे माजी सदस्य किरीट एस पारीख यांच्या नेतृत्वाखाली ही पुनरावलोकन समिती स्थापन केली आहे. ही समिती ओएनजीसी (ONGC) आणि रिलायन्ससारख्या (Reliance) प्रमुख तेल उत्पादक कंपन्यांनी उत्पादित केलेल्या गॅसच्या किंमती निश्चित करण्याच्या सूत्राचा आढावा घेणार आहे.
सरकारने स्थापन केलेली ही समिती ग्राहकांना गॅसच्या वाजवी दराबाबत सूचना देणार आहे. या समितीत शहरातील गॅस वितरण संबंधित खासगी कंपन्या, सार्वजनिक गॅस कंपनी गेल इंडिया लिमिटेड, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि खत मंत्रालयातील प्रत्येकी एक प्रतिनिधी सहभागी असणार आहे.
मार्च 2022 पर्यंत गॅसच्या किमती उत्पादन खर्चाच्या कितीतरी पटीने कमी होत्या. मात्र युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर गेल्या काही महिन्यांत हा दर झपाट्याने वाढला आहे. जुन्या गॅस फील्डमधील गॅसची किंमत एप्रिलपासून दुप्पट होऊन 6.1 डॉलर प्रति युनिट झाली आहे आणि पुढील महिन्यापर्यंत प्रति युनिट 9 डॉलरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.
मंत्रालयाने या समितीला ग्राहकांना पुरवल्या जाणाऱ्या गॅसची वाजवी किंमत सुचवण्यास सांगितले आहे. गॅसचा वापर वीज निर्मितीसह सीएनजी आणि एलपीजी म्हणून देखील केला जातो.