फसवणूक, लाचखोरीप्रकरणी Gautam Adani दोषी; अमेरिकेतून आला खळबळजनक निर्णय, काय आहे प्रकरण?
Gautam Adani Charged: न्यायालयानं सुनावलेल्या या निर्णयानंतर भारतीय शेअर बाजारात एकच खळबळ माजली. पाहता पाहता Adani Bonds कोलमडले आणि...
Gautam Adani Charged: भारतातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत नाव घेतलं जाणाऱ्या गौतम अदानी यांच्या अडचणी कमीजास्त प्रमाणात पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहेत. अदानींपुढं असणाऱ्या काही अडचणी शमत नाहीत, तोच आता नव्यानं कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचं स्पष्ट होत आहे. एकिकडे हिंडनबर्गप्रकरणी कायद्याची करडी नजर असणाऱ्या अदानींना अमेरिकेतील न्यायालयानंही दणका दिला आहे.
अदानींना न्यूयॉर्क कोर्टानं दणका दिला असून, फसवणूक आणि लाचखोरी प्रकरणात दोषी ठरवलं आहे. सौरऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी लाच दिल्याचा ठपका अदानींवर ठेवण्यात आला असून, भारतीय अधिकाऱ्यांना 25 कोटी अमेरिकन डॉलर देण्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणात न्यूयॉर्क फेडरल कोर्टानं अदानी आणि इतर 7 जणांना दोषी ठरवलं आहे.
अदानींसंदर्भातील ही बातमी समोर येताच Adani Port and Special Economic Zone, Adani Electricity Mumbai आणि Adani Transmission यांसारख्या बॉण्डमध्ये जवळपास 20 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली. न्यूयॉर्कमधील फेडरल कोर्टानं सुनवलेल्या निर्णयानुसार जवळपास 8 लोकांना याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं, ज्यामध्ये गौतम अदानी आणि त्यांच्या काही नातेवाईकांचाही समावेश आहे.
बुधवारीच गौतम अदानी यांनी 20 Year ग्रीन बॉण्डच्या विक्रीतून 600 मिलियन डॉलरची रक्कम उभी करण्याची घोषणा केली होती. Bloomberg च्या वृत्तानुसार अदानींनी ही योजनाही आता रद्द केली आहे. दरम्यान, अदानींवर लावण्यात आलेल्या या आरोपांनुसार गौतम अदानी, सागर अदानी, विनीत एस जैन यांनी लाचखोरीचे हे पैसे मिळवण्यासाठी अमेकिती आणि परदेशी गुंतवणुकदारांची फसवणूक केली.
हेसुद्धा वाचा : नजर जाईल तिथं बर्फच फर्फ... PHOTOS पाहून म्हणाल 'जन्नतों के दरमियां ये कश्मीर है...'
दोषींमध्ये कोणाकोणाची नावं?
गौतम अदानी
सागर एस अदानी
विनीत एस. जैन
रंजीत गुप्ता
सिरिल कबानेस
सौरभ अग्रवाल
दीपक मल्होत्रा
रुपेश अग्रवाल
धारण 2020 ते 2024 दरम्यान, अदानी यांच्यासमवेत सर्व आरोपींनी भारत सरकारशी करारबद्ध होण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना एकदोन नव्हे, तर तब्बल 250 मिलियन डॉलरची लाच देण्याचीही तयारी दाखवली. ही एक अशी योजना होती जिथं 20 वर्षांमध्ये 2 बिलियन डॉलरहून अधिकचा नफा मिळण्याची शक्यता होती. न्यायालयाच्या आरोपांनुसार या घोटाळ्यामध्ये ग्रँड ज्युरी, एफबीआय आणि युएस सिक्योरिटी अँड एक्सचेंज कमीशननं तपास थांबवण्यासाठीही आरोपींनी कट रचला होता. याप्रकरणी आता अमेरिकेत पुढं कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असेल.
राऊतांनी साधला निशाणा...
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीसुद्धा या प्रकरणी प्रतिक्रिया देत महाराष्ट्र हवा आहे की अदानी राष्ट्र हवंय? असा खडा सवाल केला. 'आजच अमेरिकेत अदानींविरोधात अरेस्ट वॉरंट निघालं आहे. आम्ही सांगतो अदानींने महाराष्ट्र विकायला काढला आहे. सूत्र हाती घेतल्याबरोबर ट्रम्प प्रशासनाने अदानीविरोधात अटक वॉरंट काढलं. टेंडर मिळवण्यासाठी 350 मिलियनची लाच देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. महाराष्ट्रात धारावी, विमानतळ आणि इतर अनेक महत्त्वाची टेंडर आहेत जिथं गौतम अदानीनं एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदींशी संगनमत करुन या सगळ्या जागा आणि टेंडर बळकावण्याचा प्रयत्न केलाय. आम्ही सुद्धा ट्रम्प प्रशासनाप्रमाणे कारवाई करु या विषयावर म्हणून आम्हाला पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा टाकण्यात आला आहे', असं म्हणत त्यांनी महायुतीवर जळजळीत आरोप केले.