आधी आमचे ₹ 6714 कोटी द्या! अदानींची बांगलादेशकडे मागणी; पण हा पैसा कसला?
Gautam Adani Wants 6714 Crore From Bangladesh: गौतम अदानी यांनी स्वत: यासंदर्भात पत्र लिहिलं असून है पैसे लवकरात लवकर द्यावेत अशी मागणी केली आहे. नेमकं हे प्रकरण आहे का पाहूयात...
Gautam Adani Wants 6714 Crore From Bangladesh: भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानींना मागे टाकणारे उद्योजक गौतम अदानी यांनी आता थेट बांगलादेशकडे हजारो कोटींची मागणी केली आहे. अदानींनी बांगलादेशकडे तब्बल 800 मिलियन अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 6714 कोटी 07 लाख 95 हजार रुपये (₹67,140,795,200) देण्याची मागणी केली आहे. अदानी समुहाचे अध्यक्ष असलेल्या गौतम अदानींनी बांगलादेश सरकारचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनिस यांच्याशी संपर्क साधला असून त्यांनी मध्यस्थी करावी अशी मागणी केली आहे. आता हे पैसे कसले आहेत असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाकडून हा थकित निधी अदानी पॉवर्सला मिळणं अपेक्षित आहे. हे बांगलादेशमध्ये वीजपुरवठा केल्याच्या मोबदल्यातील थकित देयक आहे.
पत्रात काय म्हटलं आहे?
गौतम अदानी यांनी यासंदर्भात एक पत्र लिहिल्याची बातमी 'इकनॉमिक टाइम्स'ने दिली आहे. "आम्ही बांगलादेशप्रती आमची जबाबदारी पार पाडली असली तरी आम्हाला अपेक्षित असलेलं देयक अद्याप मिळालेलं नाही. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मध्यस्थी तरुन आम्हाला 800 अमेरिकी मिलियन डॉलर्सचा निधी बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाकडून मिळवून देण्यात मदत करावी," असं अदानी यांनी पत्रात म्हटलं आहे.
आम्ही कायमच सेवा दिली
"तसेच या पुढे नियमितपणे आम्हाला वीजबीलाचे रक्कम दिली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आम्ही आमच्या सेवेमध्ये कधीच खंड पडू दिला नाही. त्यामुळेच मासिक देयकाबरोबरच उर्वरित रक्कमेसाठीही योग्य ते नियोजन करावे अशी विनंती आहे," असं अदानी यांनी पत्रात म्हटलं आहे.
कधीपासून थकलं आहे देयक?
बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने अदानी पॉवर्सचे 6714 कोटींहून अधिकचे वीजबील देयक थकवलं आहे. मागील आठ ते नऊ महिन्यांपासून बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने अदानी समुहाला वीज देयकाची रक्कम दिलेली नाही. मागील बऱ्याच काळापासून बांगलादेशमध्ये रक्तरंजित संघर्ष सुरु आहे. त्यापूर्वीपासूनच वीज देयक अडकून पडल्याचं चित्र दिसत आहे.
कुठून पुरवतात वीज?
झारखंडमधील कोशळ्यावर चालणाऱ्या ऊर्जानिर्मिती केंद्रातून अदानी समूह बांगलादेशला वीजपुरवठा करतो. मागील वर्षाच्या जून महिन्यापासून अदानी समूह ही सेवा पुरवत आहे. बांगलादेशमध्ये काही आठवड्यांपूर्वीच सत्तांतर झालं असून राष्ट्राध्यक्षा शेख हसिना यांनी पदाचा राजीनामा देत देशातून पळ काढला आहे. त्यानंतर या देशात नव्याने सरकार स्थापन करण्यात आल्यानंतर आता अदानी समुहाने शिल्लक पैशांची मागमी केली आहे.