शिवभोजन थाळीला जोरदार टक्कर, १ रुपयात थाळीसाठी उडाली झुंबड
अवघ्या १ रुपयात थाळीची योजना प्रत्यक्षात उतरलीय.
नवी दिल्ली : महाराष्ट्रात राज्य सरकारने सुरु केलेल्या शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळतोय. कोरोना काळात राज्यातील हजारो नागरिकांना शिवभोजन थाळीचा फायदा मिळालाय. १० रुपयांमध्ये मध्यान्ह थाळीची संकल्पना असून कोरोना काळात ५ रुपयांना थाळी देण्यात येतेय. दरम्यान शिवसेनेचे शिवभोजन थाळीच्या संकल्पनेला भाजपकडून जोरदार टक्कर मिळालीय. माजी क्रिकेटपट्टू आणि पूर्व दिल्लीतील भाजप खासदार गौतम गंभीरच्या फाऊंडेशनतर्फे अवघ्या १ रुपयात थाळीची योजना प्रत्यक्षात उतरलीय. पाहता पाहता या थाळीसाठी दिल्लीत एकच झुंबड उडाल्याचे दिसतंय.
गौतम गंभीर फाऊंडेशनतर्फे १ रुपयात मध्यान्ह थाळीची संकल्पना राबवण्यात येत असून आज याचा तिसरा दिवस आहे. मध्यान्ह थाळीसाठी लोक रांगेत उभे राहून आपली वेळ येण्याची वाट पाहतायत. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या वतीने आधी दुपारी १२ ते २ पर्यंत कुपन वाटले जातात. पण ५०-५० जणांना भोजन मिळत. जन रसोईमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रोटोकॉलवर पूर्ण लक्ष दिलं जातंय.
विना मास्क कोणालाही जन रसोईत घेतलं जात नाही. स्वयंसेवक देखील या गोष्टीवर लक्ष ठेवतात. लोकांकडून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते अशी माहिती गौतम गंभीर फाऊंडेशनच्या सीईओ अपराजिता यांनी 'झी न्यूज'ला सांगितले.