मुंबई : दक्षिण मध्य मुंबई नसेल तर ईशान्य मुंबई लोकसभेची जागा द्या. तसंच विधानसभेसाठी किमान ८-१० जागा आरपीएयला सोडायला हव्या, अशी मागणी रामदास आठवले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली. मुंबईत एक तरी जागा मिळावी यासाठी रामदास आठवले आग्रही आहेत. तर खोत, जानकर, मेटे यांच्यासोबत उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत मित्रपक्षांची लोकसभेच्या निवडणुकीबाबत भूमिका ठरेल, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. तसंच गरज पडल्यास, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनाही भेटणार असल्याचं आठवले म्हणाले. तर मित्रपक्षांची योग्य काळजी घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.


काय म्हणाले रामदास आठवले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना-भाजप युतीसाठी मीदेखील प्रयत्न करत होतो. मात्र तुम्ही दोघं एकत्र येऊन रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडू नका, असं मी म्हणालो नव्हतो. माझे आणि उद्धव ठाकरेंचे आणि माझे आणि मुख्यमंत्र्यांचे चांगले संबंध आहेतय याचा अर्थ आम्हाला वाऱ्यावर सोडा असा होत नाही. युती झाली तेव्हा आम्हाला चर्चेत सहभागी करून घ्यायला हवे होते, असं रामदास आठवले पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले.


तसंच पालघरची जागा शिवसेनेला सोडण्याची गरज नव्हती. शिवसनेनं साडेचार वर्ष सतत भाजपवर टीका केली. आम्ही मात्र भाजपची साथ दिली. प्रामाणिकपणे भाजपबरोबर राहिलो. पण शिवसेनेला एक जागा वाढवून दिली, आम्हाला अनुल्लेखानं मारू नका, अशी खंत रामदास आठवले यांनी व्यक्त केली. मला बाजूला ठेवण्याचा प्रयत्न केला तरी मी बाजूला राहणार नाही. मी सरळ माणूस आहे, पण माझ्याशी कोणी वाकडं वागलं, तर मी पण वाकडा वागू शकतो, असा इशारा आठवलेंनी दिला.


छगन भुजबळांचा निरोप


इतर पर्यायांविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा करू, मी शरद पवार यांचा मित्र आहे. त्यांचा निरोप नेहमीच येतो. छगन भुजबळ यांचाही निरोप आला आहे. मात्र आमचं काय होतंय ते बघतो आणि नंतर सांगतो, असं सांगितल्याची प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी दिली.


प्रकाश आंबेडकर यांना चांगला प्रतिसाद पण...


प्रकाश आंबेडकर यांच्या सभा कधी मैदानात होत नव्हत्या, आता मात्र होत आहेत. त्यांना प्रतिसाद मिळतो आहे, पण याचा फायदा भाजप-शिवसेनेलाच होणार आहे, असं भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलं. प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र यावं अशी समाजातील अनेकांची इच्छा आहे. माझीही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे. पण प्रकाश आंबेडकर यांची तशी इच्छा दिसत नाही. उलट ते माझ्यावर टीका करत असतात, असं रामदास आठवले म्हणाले.