देशातील `ही` मोठी एअरलाइन्स कंपनी दिवाळखोरीत? दोन दिवसांसाठी सर्व फ्लाइट्स रद्द
गो फर्स्ट एअरलाइन्सची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. विमानात इंधन भरण्यासाठीही एअरलाइन्सकडे पैसे नाहीत. वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांमुळे अर्ध्याहून अधिक विमान जागेवर उभी आहेत.
Go First Airways Suspends Flights : वाडिया ग्रुपची मालकि असलेली गो फर्स्ट एअरलाइन्स कंपनी (Go First) दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. कंपनीने NCLTमध्ये ऐच्छिक दिवाळखोरी (Voluntary insolvancy proceedings) जाहीर करण्यासाठी अर्ज दिला आहे. गो फर्स्ट एअरलाइन्सचे सीईओ कौशिक खोना यांनी दिलेल्या माहितीनुसार 28 विमानं उभी असून अर्धाहून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. इतकंच नाही तर विमानाचं इंजिन पुरवणाऱ्या प्रॅट अँड व्हिटनी (Pratt & Whitney) या कंपनीने त्यांची सेवा बंद केली होती.
उड्डाण रद्द झाल्याने कंपनीची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तीन आणि चार मे रोजीची गो फर्स्टची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. आर्थिक दिवाळखोरीसाठी अर्ज करणं हे आमच्यासाठी दुर्भाग्यपूर्ण असल्याचं कौशिक खोना यांनी म्हटलं आहे. पण कंपनीच्या हितासाठी असे निर्णय घ्यावे लागत आहेत. एअरलाइन्सने आपल्या ग्राहकांना याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर कंपनीचा सर्वसमावेशक अहवाल नागरी विमान वाहतूक नियामक (DGCA) लाही देणार आहे.
पैसा नसल्याने इंधन नाही आणि इंधन नसल्याने विमानं जागेवर उभी आहेत. आर्थिक बिकट परिस्थितीवर मात करण्यासाठी गो फर्स्ट कंपनीकडून गुंतवणूकदाराचा शोध घेतला जात आहे. त्याचबरोबर गेल्या अनेक आठवड्यांपासून पैसे जमवण्यासाठी संघर्ष करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गो फर्स्ट एअरलाइन्स कॅश अँड कॅरी मोडमध्ये आहे. म्हणजे ज्या दिवशी जितकी विमान उड्डाण करतील त्यातून मिळणाऱ्या पैशातून इंधनाची रक्कम चुकती करत आहेत. पैसे न दिल्यास इंधनाचा पुरवठा बंद केला जाईल अशी स्थिती आहे.
अर्ध्याहून अधिक विमानं बंद
दरम्यान, गो फर्स्ट एअरलाइन्स कंपनीने Pratt & Whitney कंपनीविरोात अमेरिकेतल्या एका कोर्टात याचिका दाखल केली होती. याचा निर्णय गो फस्ट कंपनीच्या बाजूने लागला होता. कंपनीला इंजिन मिळालं नाही तर कंपनी बंदल होईल असं सांगत कोर्टाने Pratt & Whitney कंपनीला खडसावलं होतं. 31 मार्चपर्यंत गो फर्स्ट कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 30 विमानांमध्ये तांत्रिक बिघाड आहे. यातली काही विमानं भाडेतत्त्वावर आहेत.
कंपनीच्या वेबसाईवर दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 61 विमानं आहेत. यात 56 ए320 नियो आणि पांच ए320सीइओ विमानं आहेत. कोरोना काळानंतर विमान प्रवासात वाढ झाल्याची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे, नेमकं याचवेळी गो फर्स्ट एअरलाइन्स आर्थिक संकटात सापडली आहे. त्यातच सुट्ट्यांचा काळही सुरु झाला आहे. गेल्या वर्षी गो फर्स्ट कंपनीचे मार्केट शेअर 11.1 टक्के इतके होते. त्यावेळी 12.7 लाख प्रवाशांनी गो फर्स्ट एअरलाइन्सच्या विमानातून प्रवास केला होता.