पणजी: गोव्यात कोरोना व्हायरसच्या Coronavirus सामूहिक संसर्गाला Community transmission सुरुवात झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, सध्या राज्यभरात विविध ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे गोव्यात कोरोनाच्या सामूहिक संसर्गाला Community transmission सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे. आपल्याला ही बाब मान्य करावीच लागेल, असे प्रमोद सावंत यांनी सांगितले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात मार्च महिन्यात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली तेव्हा इतर राज्यांच्या तुलनेत गोवा सुरक्षित मानले जात होते. एप्रिल महिन्यात गोवा राज्य संपूर्णपणे कोरोनामुक्तही झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत गोव्यात नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. अशातच २२ जूनला गोव्यात कोरोनाचा पहिला बळी नोंदवला गेला होता. 

शुक्रवारी गोव्यात कोरोनाचे ४४ नवे रुग्ण आढळून आले. गोव्यात आतापर्यंत १०३९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी ६६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ३७० जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले होते. तर दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.



लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुरु झाल्यापासून गोव्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. मे महिन्यापर्यंत गोवा जवळपास कोरोनामुक्त होते. मात्र, जून महिन्यात गोव्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. वास्को येथील मँगोर हिल आणि सत्तारी तालुक्यातील मोरलेम हे गाव राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत.