नवी दिल्ली : Diwali दिवाळीच्या या दिवसांमध्ये सोन्या चांदीच्या वस्तू, दागिने खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल दिसून येत आहे. त्यातच सोनं आणि चांदीच्या दरांकडेही सर्वांच्या नजरा लागून राहिल्याचं लक्षात येत आहे. सोमवारी एकिकडे शेअर बाजारात सेंसेक्सनं चांगली उंची गाठलेली असताना तिथं मल्टी - कमोडीटी एक्सचेंजमध्ये सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये तेजी पाहायला मिळाली असली तरीही वायदा बाजारात मात्र या दरांमध्ये घट झाल्याचं निरीक्षण करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

MCX मध्ये सोन्याच्या दरांमध्ये (Gold Rate) 1000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीच्या दरांमध्ये जवळपास 2000 रुपये प्रति किलोग्रॅम पर्यंत घट झाल्याचं पाहायला मिळालं. सोन्याच्या दरांमध्ये 2 टक्के घसरण पाहायला मिळाली ज्यामुळं हे दर 51,165 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके दिसून आले. 


चांदी (Silver) च्या दरांबाबत सांगावं तर सोमवारी सायंकाळपर्यंत चांदी 3.31 टक्के खाली येऊन 63,174 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली. चांदीचे दर  2000 रुपयांनी कमी झाल्याचं पाहायला मिळालं.  


 


समजुतदारपणे करा सोन्या- चांदीची खरेदी 


सध्याचे सणासुदीचे दिवस पाहता सोनं आणि चांदीची आभूषणं खरेदी करण्याकडे अनेकांचा कल दिसून येऊ शकतो. मुळात या दिवसांमध्ये सोन्या- चांदीचे दर किरकोळ तेजीतही दिसू शकतात. पण, ही वाढ मोठ्या प्रमाणातील नसेल असं अनेकांचं मत आहे. त्यामुळं सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी ही अत्यंत योग्य वेळ ठरु शकते. असं असलं तरीही गुंतवणूक करतेवेळी काही गोष्टींची काळजी घेत समजुतदारपणे निर्णय घेणं केव्हाही फायद्याचं ठरेल.