भारतात यावर्षी अधिक सोन्याची मागणी?
२०२० या वर्षात सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबई : वर्ल्ड गोल्ड काउंसिलने (डब्ल्यूजीसी) भारतात यावर्षी सोन्याची मागणी (Gold Demand in India) ७०० ते ८०० टन होऊ शकत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 'डब्ल्यूजीसी'नुसार, भारतात सोन्याची मागणी २०१९ मध्ये गेल्या वर्षाहून नऊ टक्क्यांनी
घसरुन ६९० टन इतकी होती. सोनं दरात झालेली जबरदस्त वाढ हे सोनं खरेदीच्या मागणीत घट होण्याचं प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, २०२० या वर्षात सोन्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
वर्ल्ड गोल्ड काउंसिलने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याची मागणी ६९० टन अधिक वाढून ती ७०० ते ८०० टन होण्याची शक्यता आहे.
भारतात डब्ल्यूजीसीचे व्यवस्थापकीय संचालक सोमासुंदरम यांनी सांगितलं की, व्यवसाय- उद्योग अधिक पारदर्शक आणि संघटित करण्यासाठी आम्ही, धोरण आणि उद्योग-समर्थित उपक्रमांची अपेक्षा करत आहोत.
सरकारने १५ जानेवारी २०२० पासून हॉलमार्किंग अनिर्वाय केलं आहे. बिना हॉलमार्किंग असणाऱ्या वस्तूंमध्ये बदल करण्यासाठी एक वर्षांचा कालावधी दिला आहे.
वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार, इटीएफमध्ये अर्थात एक्सचेंज ट्रेडेड फंडमध्ये (Exchange-traded fund) गुंतवणूक वाढल्याने, जागतिक पातळीवर सोन्याची मागणी २०१९मध्ये एक टक्क्यांनी घटली.
केंद्रीय बँकांची निव्वळ खरेदी २०१९मध्ये चांगली होती. जवळपास वार्षिक ६५०.३ टन इतकी खरेदी झाली होती. जी मागील ५० वर्षातील वार्षिक खरेदीची दुसर्या क्रमांकाची पातळी आहे. यात १५ केंद्रीय बँकांनी २०१९ दरम्यान सोन्याच्या साठ्यात जवळपास एक टन इतकी वाढ केली.
दरम्यान, वीस कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांच्या साठ्यामुळे सराफ व्यापारी सध्या चिंतेत आहेत. कारण बीआयएस होलमार्कने 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे 20 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांची पुढील एक वर्षाच्या आत विक्री करावी लागणार आहे.