नवी दिल्ली : बुधवारी सराफा बाजार सुरु होताच सोन्याच्या दरांत काहीशी घसरण पाहायला मिळाली. सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर MCX सोन्याच्या किंमतीत जवळपास 74 रुपयांची घसरण झाली. तर चांदीच्या दरात 101 रुपयांची घसरण झाली. MCXवर सोन्याचा दर 48893 प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदी 52798 रुपये प्रति किलो इतकी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना व्हायरस, जागतिक घडामोडी आणि इतर काही कारणांमुळे गेल्या आठवड्यापासून सोन्या-चांदीच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनुसार, गेल्या आठवड्यात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 179 रुपये प्रति 10 ग्रॅम घसरणीची नोंद झाली होती. तर चांदीच्या किंमतीतही 40 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी घसरण झाली होती. 


दरम्यान, सोने-चांदीमध्ये गुंतवणूक केल्यास येत्या काही दिवसांत चांगलं उत्पन्न मिळू शकेल, असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. केडिया कमोडिटीचे संचालक अजय केडिया यांच्या मते, सोन्यातील सर्व मूलभूत तत्त्वं आणि मागणीदेखील या वेळी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे MCXवर दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव 52000 रुपयांपर्यंत पोहचू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


आंतरराष्ट्रीय मार्केटनुसार, 2021 पर्यंत सोन्याचा दर 80 हजार प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहचू शकत असल्याचा अंदाज आहे. बँक ऑफ अमेरिका सिक्युरिटीज विश्लेषकांच्या अंदाजानुसार, 2021च्या शेवटापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 3000 डॉलर प्रति औसपर्यंत पोहचू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर औंसनुसार ठरतात. एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम वजन असतं. त्यामुळे एक ग्रॅम सोन्याची किंमत 8075 रुपये इतकी असते. त्यानुसार, 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजार 753 रुपये इतकी होते.


कोरोनाचा कहर अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम करत आहे. कोरोनामुळे जागतिक आर्थिक बाजारात, शेअर मार्केटमध्येही अनिश्चिततेचं वातावरण आहे. देशात, जगभरात आर्थिक संकटाच्या काळात गुंतवणूकदारांची, गुंतवणूकीसाठी पहिली पसंती सोन्यालाच असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.