नवी दिल्ली : दिल्लीसह संपूर्ण देशभरामध्ये gold rates सोन्याच्या दरांनी लक्षवेधी उंची गाठली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढणाऱ्या सोन्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. इतकंच नव्हे तर सोनं खरेदीच्या विचाराच असणाऱ्यांनाही आता हे दर घाम फोडत आहेत. कारण, प्रति तोळा, म्हणजे दहा ग्रॅम सोन्यासाठी आजच्या घडीला तब्बल ५७,००८ रुपये मोजावे लागत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इथं सराफा बाजारात सोन्याचे दर प्रत्येक दिवशी नवा उच्चांक प्रस्थापित करत असतानाच तिथं चांदीच्या दरांमध्येही अशीच तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा गाठलेला असतानाच इथं चांदीचे दर, प्रति किलोसाठी ७७,८४० रुपयांवर पोहोचले आहेत. गुरुवारी हे दर ७७,२६४ इतके होते. ज्यानंतर शुक्रवारी त्यामध्ये ५७६ रुपयांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. 


जगभरातील आर्थिक अस्थिरता पाहता गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्यामध्ये पैशांची गुंतवणूक सातत्यानं वाढवत आहेत. पण, त्याची वाढणारी किंमत किरकोळ खरेदीदारांना मात्र अडचणीत आणत आहे. 



गेल्या काही महिन्यांपासून किंवा साधारण या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरांनी उंची गाठण्यास सुरुवात केली. हे चित्रं असंच कायम राहिल्यास येता काही काळ सोनं आणि चांदीच्या दरांचा आलेख असाच उंचावत राहिल असा अभ्यासकांचा दावा आहे. मुख्य म्हणजे ऐन सणासुदीच्या दिवसांमध्येच दरांत येणारी ही तेजी पाहता आता सराफा बाजारात नेमकी काय परिस्थिती असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.