Gold Rate Expected To Increase: सोन्याच्या दरांनी मागील काही वर्षांमध्ये कमालीची उसळी खाल्ल्याचं पाहायला मिळत आहे. पाच वर्षांमध्ये सोन्याचे दर प्रति तोळा दुप्पटीहून अधिक वाढले आहेत. सध्या सोन्याचे दर 80 हजारांच्या आसपास असतानाच हे दर भविष्यात अधिक वाढतील असा दावा केला जात आहे. 18 ऑक्टोबर रोजी पहिल्यांदाच अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याच्या दरांनी प्रति औंस 2700 अमेरिकी डॉलर्सचा टाप्पा ओलांडला. म्हणजेच अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साधारण 15 दिवसांपूर्वी 2 लाख 27 हजार 161 रुपयांना एक औंस म्हणजेच 28.34 ग्राम सोनं मिळतं होतं. आता हा दर वाढला आहे. मात्र भविष्यात हा दर अधिक वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे.


1 लाख रुपये तोळा?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एका वर्षभरामध्ये सोन्याला प्रती औंस 3350 अमेरिकी डॉलर्स इतका दर मिळू शकतो असं भाकित व्यक्त करण्यात आलं आहे. म्हणजेच 28.34 ग्राम सोन्याला 2 लाख 81 हजार 848 रुपये मोजावे लागू शकतात. म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 10 ग्राम एक तोळा असा हिशोब लावल्यास एका तोळ्यासाठी वर्षभरानंतर तब्बल 99 हजार 452 रुपये मोजावे लागतील असा अंदाज गौतम शाह यांनी व्यक्त केला आहे. गौतम शाह हे गोल्डीलॉक्स प्रिमियम रिसर्चचे संस्थापक आहेत. जागतिक स्तरावरील अशांतता आणि आर्थिक अस्थिरतेमुळे सोन्याचे दर वाढत राहतील असा अंदाज शाह यांनी व्यक्त केला आहे.


सोन्याने शेअर मार्केटलाही टाकलं मागे


"मागील वर्षभरामध्ये सोन्याने परतावा देण्याच्या बाबतीत शेअर मार्केटलाही मागे टाकलं आहे. भविष्यातही सोन्याचे दर असेच वाढत राहतील. खास करुन एनएसई 500 आणि निफ्टीमधील वाढ मर्यादीत राहील," असा अंदाज शाह यांनी 'एनडीटीव्ही प्रॉफीट'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला आहे. 


परतावा 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज


मागील वर्षभरामध्ये सोन्याचे दर चांगले वाढल्याचं शाह यांनी नमूद केलं आहे. तसेच सोनं आणि चांदीचे दर आसपास येण्याची सध्या तरी दुरान्वये शक्यता नसल्याचं शाह यांनी आवर्जून सांगितलं आहे. सोन्यात गुंतवणूक का करावी याबद्दल बोलताना शाह यांनी, "पारंपारिक गुंतवणुकीमध्ये सोन्याचा वाटा हा 3 ते 5 टक्के इतका दिसून येतो. मात्र सध्या जगभरातील अस्थितरता पाहता माझ्या मते सोन्याचा परतावा हा 10 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो," असं म्हटलं आहे. दुसरीकडे चांदीचा वापर इलेक्ट्रीक वाहनांमध्ये होत असल्याने तसेच बाजारपेठ अस्थिर असल्याने चांदीलाही चांगली किंमत मिळत असल्याचं म्हटलं आहे. 


(Disclaimer: येथे देण्यात आलेली माहिती ही तज्ज्ञांची मतं आहेत. तुम्ही अशाप्रकारे कोणत्याही पद्धतीची गुंतवणूक करु इच्छित असाल तर सर्वात आधी सर्टिफाइड गुंतवणुकदार सल्लागारांचा सल्ला घ्यावा. तुम्हाला कोणताही नफा किंवा तोटा झाल्यास झी 24 तास यासाठी जबाबदार राहणार नाही.)