मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा सर्व महामारीच्या परिस्थितीत दिलासादायक बातमी म्हणजे देशात कोरोनाच्या विळख्यातून सुखरूप बाहेर येणाऱ्यांची संख्या उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या तुलनेत जवळपास ५० टक्के जास्त आहे. कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत तब्बल ७ हजार ७४५ जणांनी आपले प्राण गमावले आहे. आज सकाळी आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार देशात १ लाख ३३ हजार ६३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर दुसरीकडे आतापर्यंत १ लाख ३५ हजार २०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. ही देशासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. एकंदरीत पाहता कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची संख्या रुग्णांपेक्षा ५० टक्के जास्त आहे. गेल्या २४ तासांमध्ये देशात  ९ हजार ९८५ नवे कोरोना रुग्ण आढळले असून २७९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


तर कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ४८.८८ टक्क्यांवर पोहोचली आहे. आयसीएमआरद्वारे दररोज सॅम्पल टेस्टिंगची संख्या वाढविली जात आहे. देशातील खाजगी आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये कोरोना संसर्गाची तपासणी केली जात आहे.  आयसीएमआरच्या सांगण्यानुसार आतापर्यंत देशात ५ लाख ६१ हजार ३३२ जणांची सॅम्पल टेस्ट घेण्यात आल्या आहेत.


दरम्यान  देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शिवाय आता सरकारी कामकाजाला देखील सुरवात झाली आहे. त्यामुळे अधिक खबरदारी घेण्याचा इशारा आरोग्य मंत्रालयाने सर्वच कार्यालयांना दिला आहे. ज्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्क इत्यादी आवश्यक गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.