नवी दिल्ली : केंद्र सरकार नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंती निमित्त त्यांची पुस्तकं पुन्हा छापण्याचा विचार करत आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी फेलोशिप सुरु करण्याचा देखील विचार करत आहे. 125 व्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन होणार आहे. आयएनएच्या योद्धांना प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रित केले जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सांस्कृतिक मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव आला. बोस कुटुंबातील सदस्य, नेताजी सुभाषचंद्र बोस आयएनए ट्रस्ट, शिक्षणतज्ज्ञ, इतिहासकार आणि नेताजीशी संबंधित विविध संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी झाले होते.


बैठकीत बोलताना प्रल्हाद पटेल म्हणाले की, बोस कुटुंबीय आणि आयएनएच्या सदस्यांकडे मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक कागदपत्रे, क्लिपिंग्ज, छायाचित्रे, व्हिडिओ आणि इतर साहित्य आहेत, ते एका ठिकाणी आले पाहिजेत. कोलकाता येथे बोस यांच्या नावाने एक संग्रहालय बांधण्याचा प्रस्तावही ठेवला आहे.