नागपूर: देश हा फक्त कायद्याने नव्हे तर नागरिकांच्या भावनांवर चालतो. त्यामुळे राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने निवडणुकीपूर्वी अध्यादेश काढावा, अशी मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते रविवारी नागपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या हुंकार रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी देशातील जनतेला एकत्रपणे उभे राहण्याची हाक दिली. राम मंदिराचा पेच कायदेशीर मार्गाने सुटेल, यासाठी लोकांनी बराच काळ धीर धरला. मात्र, आता ती वेळ गेली आहे. आता राम मंदिराच्या उभारणीसाठी जनआंदोलन करायची गरज असल्याचे मोहन भागवत यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोणताही देश हा कायद्यावर नव्हे तर जनतेच्या भावनांवरही चालतो. त्यामुळे न्यायालयाने जनतेच्या भावना विचारात घेणे गरजेचे आहे. मात्र, सध्या राम मंदिर ही सर्वोच्च न्यायालयासाठी प्राथमिकता नसल्याचे दिसत आहे. राम मंदिराबाबत हिंदू समाजाची बाजू सत्य आणि न्यायची आहे. परंतु, न्यायालयाकडून याबाबतचा निर्णय सातत्याने पुढे ढकलला जातोय. समाजाच्या भल्याचे जितके निर्णय आहेत, ते टाळण्याकडेच कोर्टाचा कल असतो. न्याय उशिरा मिळणे म्हणजेच तो नाकारला जाणे. 


आपल्या देवाला हक्काचे स्थान मिळत नाही, हे पाहून सामान्य लोकांच्या भावना दुखावल्या जातात. सुशिक्षित लोकांप्रमाणे या सगळ्यामागील कायदेशीर कारणे त्यांना समजत नाहीत. त्यामुळे समाजात वाद निर्माण होतात. हे भांडण कायमचे मिटवायचे असेल तर सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता लवकरात लवकर अध्यादेश काढून राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात करावी, असे मोहन भागवत यांनी सांगितले.