..म्हणून २५ डिसेंबरला होणार गुजरातमध्ये नव्या सरकारचा शपशविधी
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. भाजप सहाव्यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.
नवी दिल्ली : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. भाजप सहाव्यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थापन करणार आहे.
सहाव्यांदा सत्तेत
गेल्या वेळच्या तुलनेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी, भाजप बहुमतात आला. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे ती, गुजरातमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची. भाजपच्या गोटात यावर विचार विनिमय सुरू असतानाच मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे.
कोण होणार मुख्यमंत्री?
182 जागांपैकी 99 भाजप, 80 काँग्रेस आणि इतर 3 अशी गुजरात विधानसभेतलं पक्षीय बलाबल आहे. कार्यकर्ते विजयाचा जल्लोष करत असतानाच पक्षाच्या प्रमुख वर्तुळात मुख्यमंत्रीपदावर कोणता चेहरा बसवायाचा यावर चर्चा सुरू आहे. भाजपने सुरूवातील विजय रूपाणी यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून निवड केली होती. मात्र, प्राप्त माहितीनुसार, रूपाणी यांच्याऐवजी भाजप दुसऱ्या नावाचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या नावावर गुजरातच्या मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय नेतृत्व शिक्कामोर्तब करू शकते.
२५ डिसेंबरला शपथविधी?
गुजरातमध्ये नव्या सरकारचा २५ डिसेंबर रोजी शपथविधी होऊ शकतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हा जन्मदिवस आहे. वर्ष 2012 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी चौथ्यांदा २५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.