नवी दिल्ली : नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. 8 नोव्हेंबर हा दिवस काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी काळा दिवस म्हणून साजरा करण्याची तयारी केली आहे. तर सरकार सरकारमधील इतर पक्षांनी 'अँटी ब्लॅक मनी' दिवस म्हणून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यातच पंतप्रधान मोदी नोटबंदीनंतरचं एक वर्ष आणि पुढची रणनीती याबाबत 8 नोव्हेंबरला मोठी घोषणा करण्याची तयारी करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत उच्च स्तरीय बैठका सुरु आहेत. पंतप्रधान मोदी 10 नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीस भ्रष्टाचार विरुद्ध पुढचं पाऊल काय असणार याबाबत योजना सादर केली जाणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नोटबंदीनंतर पंतप्रधान मोदी आता बेनामी मालमत्ता असणाऱ्या लोकांना पुढचं लक्ष्य बनवणार आहेत. नोटबंदीच्या एक वर्षानंतर सरकार भ्रष्टाचार विरुद्ध आपला लढा कायम ठेवण्याचे संकेत देणार आहे. 


संपत्तीबाबत मालकाकडे जर योग्य पुरावे नसतील तर सरकार ही जागा आपल्या ताब्यात घेणार आहे. ही बेनामी मालमत्ता गरीबांसाठी एखाद्या योजनेशी जोडली जाईल. जसं काळ्या पैशांविरोधात एक योजना सरकारने आणली होती ज्यामध्ये काळा पैसा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत टाकण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. सरकारला आशा आहे की बेनामी मालमत्तेच्या विरोधातील या मोहीमेमध्ये अनेक मोठ्या नेत्यांची बेनामी मालमत्ता समोर येऊ शकते.