नवी दिल्ली - दोनच वर्षांपूर्वी वापरात आलेल्या २००० रुपयांच्या चलनी नोटांची छपाई केंद्र सरकारने बंद केली आहे. हळूहळू या नोटा बाजारातून काढून घेण्यात येणार आहेत. त्यासाठी त्याची छपाई बंद केल्याचे वृत्त 'द प्रिंट'ने प्रसिद्ध केले आहे. अर्थात २००० रुपयांची नोट आजही चलनात असून, त्याच्या वापरावर कोणतेही बंधन नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कर चुकवेगिरी, पैशांची अफरातफर यासाठी दोन हजार रुपायांच्या नोटेचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळेच त्याची छपाई बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे 'द प्रिंट'च्या वृत्तात म्हटले आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी निश्चलनीकरण जाहीर केल्यावर ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बाद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांची नवी नोट त्याच महिन्यात चलनात आणली होती. नोटाबंदीने चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे ही नोट तातडीने चलनात आणण्यात आली होती. एवढ्या मोठ्या रकमेची नोट पहिल्यांदाच चलनात आणल्यामुळे यावर समिश्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीकाही केली होती. एवढ्या मोठ्या रकमेची नोट चलनात आणल्यामुळे भविष्यात करचुकवेगिरी, भ्रष्टाचार आणि पैशांची अफरातफर करणाऱ्यांकडून त्याचा वापर केला जाईल, असे विरोधकांनी म्हटले होते. त्यानंतर आता दोनच वर्षात या नोटांची नव्याने छपाई करण्याचे थांबविण्यात आले आहे. ज्या नोटा बाजारात उपलब्ध आहेत. त्याच वापरात राहतील. नव्याने छापलेल्या २००० रुपयांच्या नोटा बाजारात येणार नाहीत, असे 'द प्रिंट'च्या वृत्तावरून समजते.