Bride waiting For Groom: मुलीच्या हाताला मेहंदी लागली होती. दारात मंडप थाटला होता. लग्न घरात पाहुण्यांची ये-जा सुरु होती. नवरीचे वडील फेटा बांधून तयार होते. कुणाला काही कमी पडत नाही ना? याची खातरजमा नवरीचा भाऊ करत होता. नवरीची आई मुलीचं कौतुक करताना थांबत नव्हती. सनई चौघड्यांचे मंगल सूर परिसरात घुमत होते. पंडितजी अग्निकुंड मांडण्याच्या तयारीत होते. नवरी सुखी संसाराची स्वप्न पाहात होती. घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. मुहूर्त घटीका समीप येत होती. आतापर्यंत नवरीचे नातेवाईक गावाच्या वेशीवरुन चार वेळा जाऊन आले होते. त्यांच्या येरझारा संपता संपेना... प्रत्येक जण नवरा मुलाच्या प्रतीक्षेत होते. मात्र, आनंदात विरझण पडलं, संपूर्ण रात्र सरली पण नवरा आलाच नाही. लग्नमंडपातील वातावरण अचानक गंभीर झालं. ही घटना मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh)छिंदवाडाच्या (Chindwada ) देहात इथली आहे. 


नवऱ्याची वाट पाहण्यातच नवरीची रात्र सरली...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मुलीचं लग्न होतं. मुलगा छिंदवाड्यातील खैरीचेतूचा रहिवासी. मुलगा मध्य प्रदेश पोलीस दलात कामाला होता. मुला-मुलीच्या सहमतीने कुटुंबीयांनी दोघांचं लग्न ठरवलं. लग्नाची संपूर्ण तयारी झाली. पण ऐन लग्नाच्या दिवशी मुलगा आलाच नाही. 


नवऱ्या मुलाची वरात का आली नाही?


सहसंमतीने लग्न तर ठरलं, मात्र नवऱ्या मुलाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याची प्रेयसी मध्य प्रदेशातील बैतूल येथील रहिवासी. आपला प्रियकर कुण्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय हे लक्षात येताच, मुलीने थेट पोलीस स्टेशन गाठलं. प्रेयसीने प्रियकराविरोधात पोलिसांत तक्रार दिली. या सगळ्या प्रकरणामुळं मुलगा त्या दिवशी लग्नमंडपात पोहोचलाच नाही.


पण सगळ्या स्वप्नांचा चक्काचूर झालेल्या नवरी मुलीने होणाऱ्या नवऱ्याला धडा शिकवण्याचं ठरवलं होतं. तिनेही पोलिसांत तक्रार केली. ऐनवेळी दगा देणाऱ्या नवऱ्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय.