मुंबई : लग्न म्हटलं की जितका उत्साह आला, तितकाच भावभावनांचा मनात सुरु असणारा कल्लोळही आलाच. ओघाओघानं दाटून येणाऱ्या भावना कधी या सोहळ्यादरम्यान, आसवांवाटे बाहेर पडतात हे सांगणं तसं कठीणच. फक्त नववधूच नव्हे, तर नवऱ्या मुलासाठीसुद्धा हे सर्व क्षण तितकेच भावनिक असतात हेसुद्धा अगदी खरं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर असंख्य वेडिंग व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही छायाचित्रकार त्यांनी उपस्थिती लावलेल्या अनेक विवाहसोहळ्यांची झलक सर्वांच्याच भेटीला आणत असतात. सध्या अशाच एका विवाहसोहळ्यातील व्हिडीओ अनेकांच्याच काळजाचा ठाव घेताना दिसत आहे.


सहसा लग्नसोहळ्यांमध्ये नवरी मुलगी तिचं घर सोडून जाण्याच्या भावनेनं अतिशय भावनिक झालेली दिसते. पण, Witty Wedding नावाच्या एका पेजवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये नवरदेवच भावूक होऊन रडू लागल्याचं पाहायला मिळत आहे.


लग्नसोहळ्याच्या ठिकाणी येताच नवरीबाई उत्साहात डान्स करु लागते. तिचा उत्साह आणि आनंद पाहून नवरदेवाला आनंदाश्रू अनावर होत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्याचा मित्रपरिवार आधार देत असतानाही त्याचं रडणं काही थांबत नाही, शेवटी नवरी मुलगीच त्याच्याशी संवाद साधते, हे करत असताना काही क्षणांसाठी तिच्याही भावना दाटून आल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.



आतापर्यंत या व्हिडीओला हजारो लाईक्स मिळाले असून, त्याच्या व्ह्यूजचा आकडाही वाढतच चालला आहे. लग्नसोहळ्यांमध्ये तसा प्रत्येक क्षण हा अविस्मरणीयच असतो. तुम्ही तुमच्या किंवा इतर कोणाच्या विवाहसोहळ्यात असा क्षण अनुभवला आहे का?