जीएसटी कलेक्शन घसरलं... सरकारची डोकेदुखी वाढली
जीएसटी लागू झाल्यानंतर चौथ्या महिन्यात सरकारला चांगलाच झटका बसलाय. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात जमा झालेल्या जीएसटीमध्ये तब्बल १० टक्क्यांची घट नोंदवण्यात आलीय.
मुंबई : जीएसटी लागू झाल्यानंतर चौथ्या महिन्यात सरकारला चांगलाच झटका बसलाय. जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात जमा झालेल्या जीएसटीमध्ये तब्बल १० टक्क्यांची घट नोंदवण्यात आलीय.
अर्थातच याचा परिणाम सरकारच्या तिजोरीवर होणार आहे. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात सरकारी तिजोरीला तब्बल १० हजार करोड रुपयांचं नुकसान झालंय.
काय सांगतेय आकडेवारी?
अर्थ मंत्रालयानं २७ नोव्हेंबरपर्यंत फाईल करण्यात आलेल्या इन्कम टॅक्स रिटर्नची आकडेवारी जाहीर केलीय. यानुसार, ऑक्टोबर महिन्यासाठी जीएसटी अंतर्गत ८३,३४६ करोड रुपये सरकारी तिजोरीत जमा झालेत.
सरकारच्या म्हणण्यानुसार, जीएसटी अंतर्गत आत्तापर्यंत ९५.९ लाख करदाते रजिस्टर झालेत. यामध्ये १५.१ लाख कम्पोजिशन डिलर आहेत... त्यांना तिमाही रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे. ऑक्टोबरपासून २६ नोव्हेंबरपर्यंत ५०.१ लाख जीएसटी रिटर्न फाईल झालेत.
काय आहे कारण?
जीएसटी स्लॅबमध्ये करण्यात आलेल्या बदलांमुळे जीएसटी कलेक्शन घसरल्याचं सरकारचं म्हणणं आहे. याशिवाय, १० नोव्हेंबर रोजी जीएसटी काऊन्सिलच्या २३ व्या बैठकीत २०० हून अधिक वस्तूंवर टॅक्सदर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.