सूरत : गुजरात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. राज्यात सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावत शक्तीप्रदर्शन आणि जाहीर सभा घेण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत यंदा भाजपसमोर काँग्रेस पक्षाने मोठं आव्हान उभं केलं आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षातील नेते गुजरातमध्ये ठाण मांडुन बसले आहेत. तसेच जाहीर सभांमध्ये एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'होम ग्राऊंड' असलेल्या गुजरातमध्ये असे काही मतदारसंघ आहेत ज्यांच्याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. एक नजर टाकूयात या महत्वाच्या मतदारसंघांवर...


मणिनगर मतदारसंघ:


सुरेश पटेल (भाजप) vs श्वेता ब्रह्मभट्ट (काँग्रेस)



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग १३ वर्षे ज्या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं तो म्हणजे मणिनगर... गुजरात निवडणुकीतील या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे. कॉंग्रेसने या मतदारसंघातून श्‍वेता ब्रह्मभट्ट या ग्लॅमरस चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने सुरेश पटेल यांना उमेदवारी दिली आहे. 


ठक्करबापानगर मतदारसंघ: 


वल्लभ काकडिया (भाजप) vs बाबुभाई मांगुकिया (काँग्रेस)



या मतदारसंघातून भाजपने आमदार आणि परिवहनमंत्री वल्लभ काकडिया यांना पुन्हा संधी दिली आहे. त्यांनी २०१२च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार गीता पटेल यांचा पराभव केला होता. तर, काँग्रेसने हार्दिक पटेलची केस लढणारे वकील बाबुभाई मांगुकिया यांना रिंगणात उतरवलं आहे. 


वडगाम मतदारसंघ: 


जिग्नेश मेवाणी (अपक्ष) vs विजय चक्रवर्ती (भाजप)



गुजरातमधील दलित नेते जिग्नेश मेवाणी हे वडगाम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. बनासकांठा जिह्यातील वडगाम मतदारसंघातून जिग्नेश मेवाणी अपक्ष उमेदवार म्हणून लढणार असून काँग्रेसने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या विरोधात भाजपने विजय चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली आहे.


लिंबायत मतदारसंघ


संगीता पाटील (भाजप) vs रविंद्र पाटील (काँग्रेस)



सुरतच्या लिंबायत मतदारसंघातून भाजपने संगीता पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेस-भाजप-काँग्रेस असा प्रवास केलेल्या रवींद्र पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.


भावनगर पश्चिम मतदारसंघ:


जीतु वाघाणी (भाजप) vs दिलीपसिंह गोहिल (काँग्रेस)



गुजरात विधानसभा निवडणुकीत भावनगर पश्चिम मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात जबरदस्त सामना होण्याची चिन्ह आहेत. भाजपने सध्याचे आमदार जीतु वाघाणी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसने दिलीपसिंह गोहिल यांना उमेदवारी दिली आहे. हार्दिक पटेलने काँग्रेसला समर्थन दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.


सिद्धपुर मतदारसंघ: 


जयनारायण व्यास (भाजप) vs चंदन ठाकोर (काँग्रेस)



भाजपचे वरिष्ठ नेता आणि माजी मंत्री जयनारायण व्यास यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर व्यास यांच्याविरोधात काँग्रेसने चंदन ठाकोर यांना मैदानात उतरवलं आहे. 


दसाडा मतदारसंघ:


रमणलाल वोरा (भाजप) vs नौशाद सोलंकी (Naushadji B Solanki)(काँग्रेस)



गुजरातमधील आरक्षित मतदारसंघांपैकी एक असलेल्या दसाडा मतदारसंघ हा दलितांसाठी आरक्षित आहे. या मतदारसंघातून भाजपने रमणलाल वोरा यांना तर काँग्रसने नौशाद सोलंकी यांना उमेदवारी दिली आहे. 


जेतपुर मतदारसंघ:


जयेश रादडिया (भाजप) vs रवि अंबेलिया (काँग्रेस)



राजकोट जिल्ह्यातील जेतपुर मतदारसंघातून भाजपने जयेश रादडिया यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेसने रवि अंबेलिया यांना उमेदवारी दिली आहे.


जुनागढ मतदारसंघ:


महेंद्र मशरू (भाजप) vs भीखाभाई जोशी (काँग्रेस)



गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जुनागढ मतदारशंगातून भीखाभाई जोशी यांना उमेदवारी दिली आहे. तर, भाजपने महेंद्र मशरू यांना उमेदवारी दिली आहे.


इडर मतदारसंघ:


हितेशभाई कनोडिया (भाजप) vs मणिलाल वाघेला (काँग्रेस)



इडर मतदारसंघातून भाजपने हितेशभाई कनोडिया यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसने मणिलाल वाघेला यांना रिंगणात उतरवलं आहे.


बोटाद मतदारसंघ:


सौरभ पटेल (भाजप) vs डी. एम. पटेल (काँग्रेस)



बोटाद मतदारसंघातून भाजपने सौरभ पटेल तर काँग्रसने डी.एम. पटेल यांना उमेदवारी दिली आहे. 


वाव मतदारसंघ:


शंकर चौधरी (भाजप) vs गनीबेन ठाकोर (Geniben Thakor)(काँग्रेस)



बनासकांठा जिल्ह्यातील वाव मतदारसंघात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या शंकर चौधरी यांनी विजय मिळवला होता. यंदाही भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसने गनीबेन ठाकोर यांना उमेदवारी दिली आहे.


साणंद मतदारसंघ: 


कनु मकवाणा (भाजप) vs पुष्पा डाभी (काँग्रेस) vs कमाभाई राठोड (अपक्ष)



साणंद या मतदारसंघात तिरंगी लढत पहायला मिळण्याची चिन्ह आहेत. भाजपने कनु मकवाणा यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने पुष्पा डाभी यांना उमेदवारी दिली आहे. तर, अपक्ष उमेदवार कमाभाई राठोडही रिंगणात उतरले आहेत.


गोंडल मतदारसंघ: 


गीताबा जाडेजा (भाजप) vs अर्जुन खटारिया (काँग्रेस)



राजकोट जिल्ह्यातील गोंडल विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना रंगणार आहे. या ठिकाणी भाजपने गीताबा जाडेजा यांना तर काँग्रेसने अर्जुन खटारिया यांना उमेदवारी दिली आहे.


वडोदरा मतदारसंघ:


रंजनबेन भट्ट  (भाजप) vs नरेन्द्र रावत (काँग्रेस)



वडोदरा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत पहायला मिळणार आहे. भाजपने रंजनबेन भट्ट यांना तर काँग्रेसने नरेंद्र रावत यांना उमेदवारी दिली आहे. 


वडोदरा शहर मतदारसंघ:


मनीषा वकील (भाजप) vs अनिल परमार (काँग्रेस) vs चंद्रिका सोलंकी (अपक्ष)



या मतदारसंघातून भाजपतर्फे मनीषा वकील, काँग्रेसतर्फे अनिल परमार यांना उमेदवारी दिली आहे. तर चंद्रिका सोलंकी यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत पहायला मिळणार आहे.