गुजरातमध्ये भाजपविरूद्ध कॉंग्रेसची डाव्यांसोबत आघाडी?
आगामी काळात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ आडविण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्यासाठी सावध पावले टाकत भाजप विरोधातील सर्व पक्ष आणि घटकांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस डाव्यांनाही सोबत घेण्याची चिन्हे आहेत.
नवी दिल्ली : आगामी काळात गुजरातमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा विजयरथ आडविण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेससमोर आहे. त्यासाठी सावध पावले टाकत भाजप विरोधातील सर्व पक्ष आणि घटकांना सोबत घेऊन आघाडी करण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने सुरू केले आहेत. या प्रयत्नांचा भाग म्हणून कॉंग्रेस डाव्यांनाही सोबत घेण्याची चिन्हे आहेत.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे राजकीय उगमस्थान असलेल्या गुजरातमध्येच भाजपचा विजयरथ आडविण्याचा कॉंग्रेसचा निर्धार आहे. कॉंग्रेसच्या या निर्धाराला संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष आणि बंडखोर नेते शरद यादव यांचेही समर्थन आहे. हा निर्धार अधीक ठळक करण्यासाठी आणि निश्चित ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कॉंग्रेस डाव्यांसोबत आणि गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याच्यासोबतही आघाडी करण्याच्या प्रयत्नात असल्याची सूत्रांची माहिती आहे.
या वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात गुजरातमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडण्याची शक्यता आहे. गुजरात विधानसभेवर सध्या भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे केंद्रात आणि राज्यातही कमळ सत्तेत आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखे आक्रमक आणि प्रभावशाली नेतृत्व आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासारखा निवडणूक रणनितीकार भात्यात असल्यामुळे भाजपचे पारडे सध्यातरी जड आहे. मात्र, लोकशाहीत राजकीय बाजी केव्हाही पलटू शकते. त्यामुळे भाजपचे आव्हान कॉंग्रेस पेलणार का याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.