अहमदाबाद : पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध अशा समजल्या जाणाऱ्या भारतात पर्यटनाच्याच दृष्टीने काही महत्त्वाच्या सुधारणा करण्यात येत आहेत. एखाद्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सुविधा असो किंवा मग तेथे पोहोचण्यासाठीची व्यवस्था असो. सरकारकडून पर्यटकांच्या मागण्या पूर्ण करण्यावरच जास्तीत जास्त कल असतो. सध्या पर्यटनाविषयीच्या चर्चा रंगण्यास कारण म्हणजे एक निर्णय. 


गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शुक्रवारी याच निर्णयाविषयीची अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. सौराष्ट्र येथील प्रसिद्ध सोमनाथ मंदिर आणि उत्तर गुजरात येथील अंबाजी मंदिर परिसराच्या आजूबाजूचा जवळपास ५०० मीटरपर्यंतच्या भागात मांसबंदी करण्यात आली असून, हा त्यांनी 'व्हेजियेरियन झोन' म्हणून घोषित केला. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रुपाणी यांनी केलेल्या या घोषणेनंतर आता मांस, मटण आणि इतर कोणत्याच मांसाहारी पदार्थाची विक्रीही या परिसरात होणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. 'मी जाहीर करतो की अंबाजी आणि सोमनाथ मंदिर परिसराच्या हद्दीत येणारा ५०० मीटरपर्यंतचा भाग हा यापुढे 'व्हेजिटेरियन झोन' असेल. आतापासून पुढे या भागांमध्ये मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी असेल', असं रुपाणी पालनपूर येखे आयोजित एका कार्यक्रमात म्हणाले. 


देशातील इतरही बऱ्याच धार्मिक स्थळांच्या परिसरातील स्थानिकांनी आणि काही मंदिर प्रशासनांनी याआधीच अशा मागण्या केल्याचं पाहायला मिळालं होतं. मुख्य म्हणजे देशातील बऱ्याच धार्मिक प्रर्यटनस्थळांवर मांसाहाराची विक्री केली जात नाही ही बाबही महत्त्वाची आहे.