राजकोट पश्चिममधून मुख्यमंत्र्यांचा विजय, पण भाजपला आत्मपरीक्षण करायला लावणारा
गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना सुरुवातीला आघाडी मिळवता आली नाही.
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपसमोर कडवे आव्हान उभे केले. त्यामुळे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना सुरुवातीला आघाडी मिळवता आली नाही. ते ६००० मतांनी मागे पडले होते. मात्र, त्यांनी अखेर काँग्रेसचे उमेदवार इंद्रनील राजगुरू यांचा १५,४४२ मतांनी पराभव केला. रुपाणी यांच्या विजयामुळं भाजपचा जीव भांड्यात पडलाय.
रुपाणी यांना राजगुरुंचे तगडे आव्हान
मुख्यमंत्री विजय रुपाणी अखेर राजकोट पश्चिममधून विजयी झाले तरी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला आहे. त्यांच्या मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घ्याव्या लागल्या होत्या. त्यामुळे भाजपला काँग्रेसचे आव्हान होते, हे या निवडणुकीतून दिसून आले.
फारशी चमकदार कामगिरी नाही
मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांच्या राजीनाम्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्री म्हणून विजय रुपाणी यांची निवड केली होती. मोदी-शहांच्या अनुपस्थितीत रुपाणी यांनी गुजरातमध्ये भाजपला सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी सरकार म्हणून त्यांना फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात पंतप्रधानांना उतरावे लागले. मोदींच्या ३० पेक्षा जास्त सभा या निवडणुकीत झाल्या.
रुपाणी सहा हजार मतांनी मागे
काँग्रेसचे उमेदवार राजगुरु यांना प्रचारात मोठा प्रतिसादही मिळत होता. सुरुवातीच्या टप्प्यातील मतमोजणीत त्याचं प्रतिबिंब पडून रुपाणी सहा हजार मतांनी मागे फेकले गेले. त्यामुळे भाजपच्या गोठात मोठी अस्वस्थता होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये रुपाणी यांनी 'कमबॅक' करतआघाडी घेतली. ही आघाडी वाढतच गेली विजय मिळवला.
दरम्यान, राजकोट हा संपूर्णपणे शहरी मतदारसंघ आहे. २००२मध्ये नरेंद्र मोदी यांनी या जागेवरून निवडणूक जिंकली होती. मात्र, काँग्रेसने येथे जोरदार टक्कर दिली.